मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवादा’त डॉ. खेतान, डॉ. गांधी यांनी साधला संवाद
नागपूर: कोव्हिड काळात अतिगंभीर आजार असलेल्या व्यक्तींची कुटुंबीयांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या रुग्णांनी अत्यंत दक्ष राहणे आवश्यक आहे. काळजी न घेतल्यास कोरोना अशा रुग्णांभोवती लवकर पाश आवळतो. काळजी आणि दक्षता हाच उपाय असल्याचे किडनी विकार तज्ज्ञ डॉ. प्रकाश खेतान आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रमोद गांधी यांनी सांगितले.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या मनातील कोव्हिडविषयी असलेली भीती घालविण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनातील शंका, प्रश्नांना उत्तरे मिळावीत यासाठी ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.
‘कोव्हिड आणि अतिगंभीर आजार’ हा आजच्या ‘कोव्हिड संवाद’चा विषय होता. कोव्हिडकाळात आजार असलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यायची, कुठले उपचार करायचे, कोव्हिड पॉझिटिव्ह आल्यास काय काळजी घ्यायची, रुग्णालयात दाखल कधी व्हावे, आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. किडनीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी काय विशेष काळजी घ्यायची, याबाबत डॉ. प्रकाश खेतान यांनी मार्गदर्शन केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब आदीच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी, याबाबत डॉ. प्रमोद गांधी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक दिसून येत असून याचा परिणाम अतिगंभीर आजार असलेल्या रुग्णांवर लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनासंदर्भातील सर्व नियम प्रत्येकाने प्राधान्याने पाळावे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा नियमित वापर, सामाजिक अंतराचे पालन आणि वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे अथवा सॅनिटाईज करणे, या बाबी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन डॉक्टरद्वयींनी यावेळी केले.
रक्तदान आणि अवयवदान करा : डॉ. संजय देवतळे
आजच्या कोव्हिड संवादादरम्यान इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनीही मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे रक्तसाठा संपल्यागत आहे. लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करण्यासाठी काही नियम आहेत. त्यामुळे युवा वर्गाने पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान आणि अवयवदान करावे व आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन डॉ. संजय देवतळे यांनी केले.
Source link