प्रत्येक गावात 2-3 उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न
एमएसएमईतील अनिवासी भारतीय उद्योजकांशी संवाद
नागपूर: देशात कोणकोणता माल, उत्पादन आयात केला जातो, याची माहिती घेऊन आयातीला भारतीय पर्याय निर्माण करून आयात रोखणे आणि निर्यात वाढविणे. तसेच कृषी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे म्हणजे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार होईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
एमएसएमईतील अनिवासी भारतीय उद्योजकांशी ना. गडकरी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले- एमएसएमई ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज सकल राष्ट्रीय उत्पन्नात एमएसएमईचा सहभाग 30 टक्के आहे, 48 टक्के निर्यात व 11 कोटी रोजगार निर्मिती या विभागाने केली आहे. कृषी ग्रामीण आणि आदिवासी भागात उद्योगांचा विकास झाला तरच रोजगार निर्मिती होईल व दरडोई राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात 2-3 उद्योग सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- गायीच्या शेणापासून निर्माण होणारा पेंटचा उद्योग प्रत्येक गावात सुरु व्हावा. केवळ 12 लाख रुपयांमध्ये हा उद्योग सुरु होतो. या उद्योगासाठीचे प्रशिक्षण सुरु झाले आहे.
गावात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालावर आधारित उद्योग सुरु व्हावा, यासाठीही एमएसएमईच्या माध्यमातून आपले प्रयत्न सुरु असल्याचे सांगून ते म्हणाले- गावागावात, आदिवासी, वनवासी क्षेत्रात, मागास भागात नवीन उद्योग सुरु झाले तर चांगली अर्थव्यवस्था उदयास येईल. आत्मनिर्भर भारत म्हणजे गावांचा विकास, शेतकर्यांचा विकास, उद्योगांना चालना, रोजगाराचे निर्माण, आयातीवर नियंत्रण, निर्यातवाढ हीच संकल्पना आहे. जे साहित्य आपल्याला अन्य देशांकडून आयात करावे लागते. ते तयार करण्यासाठी भारतात सर्व प्रकारचा कच्चा माल उपलब्ध असताना आपण ते उत्पादन येथे तयार करून आत्मनिर्भर का व्हायचे नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
इथेनॉल, बायो इथेनॉल, सीएनजी, एलएनजी, सौर ऊर्जा अशा जैविक इंधनाचा वापर करून आपण 8 लाख कोटींच्या कच्च्या तेलाची आयात कमी करू शकतो, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- इथेनॉलच्या पंपालाही आता मान्यता आहे. लवकरच चार चाकी वाहनांना फ्लेक्स इंजिन आणण्याचा आपला प्रयत्न असून या इंजिनामुळे इथेनॉल व पेट्रोल दोन्हीवर वाहन चालणार आहे. दर्जेदार उत्पादन, वेळेत डिलिव्हरी आणि आकर्षक पॅकिंग असेल तर आपले उत्पादनही निर्यात होऊ शकते. आगामी काळात आमच्यात काय क्षमता आहेत, शासकीय योजनांचा फायदा आम्हाला कसा घेता येईल याचा विचार एमएसएमईंना करावा लागणार आहे. शासन मदतीसाठी कटिबध्द आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.






















Source link