कोविडच्या रुग्णांसाठी ना. गडकरींच्या प्रयत्नांमुळे 1200 बेड होणार उपलब्ध


5 हजार ऑक्सीजन सिलेंडर,
2 हजार व्हेंटिलेटर लवकरच नागपुरात
वर्धा येथे होणार रेमडेसीवीरचे उत्पादन
मनपा-एम्सच्या अधिकार्‍यांसोबत बैठक

नागपूर: शहरातील कोविड रुग्णांची उपचारांअभावी होणारी परवड लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1200 अतिरिक्त बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश आज मनपा आणि एम्सच्या डॉक्टरांना दिले. त्यामुळे आता शहरात मेयो 100, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल 100, एम्स रुग्णालय 500 आणि मनपाच्या दवाखान्यांमध्ये 300 अतिरिक्त बेडची व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे.

तसेच ऑक्सीजनविना आणि व्हेंटिलेटरविना रुग्ण दगावत असताना ना. गडकरी यांनी 5 हजार ऑक्सीजन सिलेंडर आणि 2 हजार व्हेंटिलेटरची व्यवस्थाही केली असून लवकरच सिलेंडर आणि व्हेंटिलेटर नागपुरात उपलब्ध होत आहेत. आजच्या बैठकीत महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, महापौर दयाशंकर तिवारी, आ. प्रवीण दटके, एम्सचे डॉ. मनीष श्रीगिरीवार, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके उपस्थित होते.

एम्समध्ये 500 बेड ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्ससह तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. यासाठी महापालिका बेड आणि आवश्यक साहित्य एम्सला देण्यास तयार आहे. युध्दपातळीवर बेड वाढविण्यासाठी प्रयत्न ना. गडकरी यांच्याकडून केले जात आहेत. ज्या लागतील त्या व्यवस्था करून देऊ, पण रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत, अशी भूमिका ना. गडकरी यांनी सध्या घेतली आहे.

मेयो, मेडिकलसह महापालिकेने आपले स्वत:चे ऑक्सीजन प्लांट उभे करण्यास त्वरित कारवाई करावी. या दृष्टीने ना. गडकरी यांनी स्वत:च पुढाकार घेत व प्लांटसंबंधी तज्ञ व्यक्तींशी चर्चा करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

खाजगी रुग्णालयांमध्ये बेड वाढवावेत यासाठी आवाहन करा व त्यांना बेड वाढविण्यासाठी त्वरित परवानगी देण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी आज दिले. यासोबतच मनपाच्या ऑक्सीजन प्लांटची क्षमता वाढविता येते काय, याद़ृष्टीनेही प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयनॉक्स ही कंपनी 85 टक्के ऑक्सीजन तयार करीत आहे. या कंपनीच्या पुरवठ्यावर सध्या नागपूर सुरु आहे. महापालिकेच्या जागेवर कुण्या एजन्सीला त्वरित प्लांट उभा करणे शक्य आहे काय, यासाठीही ना. गडकरींचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच रेमडिसीवीर या इंजेक्शनसाठी वर्धा येथील क्षीरसागर यांच्या कंपनीला ना. गडकरी यांनी औषध उत्पादनाची मान्यता मिळवून दिली. उद्यापासून या फॅक्टरीमधून रेमडीसीवीरचे उत्पादन सुरु होऊ शकते.
Source link

Leave a Reply