गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात


भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील कोरोना स्थिती हाताळण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. नागपूर मध्ये रेमडीसीवर औषधांचा पुरवठा, ऑक्सिजनची सुविधा, रूग्णांसाठी खाटा उपलब्ध करणे अशा प्रत्येक पातळीवर श्री. गडकरी व श्री. फडणवीस हे जातीने लक्ष देऊन कामे करत आहेत. त्यामुळे श्री. गडकरी व श्री. फडणवीस यांनी नागपूरमध्ये कोरोना रूग्णांसाठी काय केले हा प्रश्न दर पावसाळ्यात पक्ष बदलणारे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढेंनी विचारणे हास्यास्पद आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली.

मुंबईत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. प्रसाद लाड व भाजपा अध्यात्म आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.

श्री. पाठक म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुरूवातीला विदर्भातील परिस्थिती भयावह होती. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहिले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. गडकरी यांच्या मदतीमुळे विदर्भामध्ये 11 हजार 400 रेमडिसीवर औषधांचा पुरवठा करता आला. श्री. गडकरी यांनी या औषधाच्या उत्पादनासाठी नवीन प्रकल्पांना केंद्राकडून मंजूरी मिळवून दिली आहे. याचा फायदा हा संपूर्ण राज्याला होणार आहे. तसेच एक हजार पोर्टेबल ऑक्सिजनची सुविधा व एक हजार व्हेटिंलेटरची सुविधा सुध्दा त्यांनी उपलब्ध करून दिली. रूग्णालयांमध्ये कमीत कमी वेळेत खाटा कशा वाढवता येतील त्यासाठी त्यांनी योग्य ते निर्णय घेतले आहेत. राधास्वामी रुग्णालयाला 2 हजार रेमडीसीवर उपलब्ध करून देण्यात आले.

श्री. पाठक म्हणाले की, फडणवीस हे स्वत: नागपूरमध्ये थांबून तेथील परिस्थिती हाताळत आहेत. राज्यात रेमडिसीवर औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी ते नियमीत केंद्राशी समन्वय साधत आहेत. त्यांच्या पुढाकारातून नागपूर येथे गुरूवारी एनसीआय येथे 100 खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात आले. तसेच सेवांकुर या संस्थेच्या माध्यमातून 24 तास जनतेच्या सेवेसाठी संपर्क यंत्रणा ते सुरू करत आहेत.

श्री. पाठक म्हणाले की, लोंढे यांनी कोणत्याही प्रकारचे बेछुट आरोप करण्याआधी संपुर्ण माहिती व अभ्यास करणे गरजेचे आहे. श्री. गडकरी व श्री. फडणवीस या दोघांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीत नागपूरची जेवढी प्रगती झाली नव्हती त्याहून कितीतरी अधिकपटीने नागपूरचा विकास गेल्या सहा वर्षात झाला आहे, आणि केवळ नागपूरचाच नाही तर संपूर्ण राज्याचा विकास या दोन नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहे. मात्र, दर पावसाळ्यात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना स्वत:च्या स्वार्थापुढे विकासाची कामे दिसत नाहीत असे श्री. पाठक म्हणाले.
Source link

Leave a Reply