१८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापौरांचे निर्देश
नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होऊ शकतो. शहरात उपलब्ध होणाऱ्या लसींची संख्या लक्षात घेऊन १ मे पासूनचे लसीकरणाचे नियोजन करा. या काळात ज्येष्ठांना लसीकरणात बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
१८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत आमदार गिरीश व्यास, आमदार तथा माजी महापौर प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., माजी महापौर संदीप जोशी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, स्थायी समितीचे माजी सभापती विजय झलके, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, मनपा निगम सचिव डॉ.रंजना लाडे, यांच्यासह नगरसेवक, सर्व सहायक आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
सदर बैठकीत लसीकरणाच्या नियोजनासंदर्भात चर्चा होतानाच चाचणी केंद्र आणि समन्वय या विषयावरही चर्चा झाली. आमदार प्रवीण दटके यांनी एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र आणि चाचणी केंद्र नको, अशी सूचना केली. तसेच त्यांनी लसीकरणाची माहिती नगरसेवकांना एक दिवस अगोदर देण्याची मागणी केली. माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रत्येक केंद्रांवर लसींचा समान साठा पाठविण्यात यावा, अशी सूचना केली. स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर म्हणाले, कोणत्या केंद्रावर किती लस उपलब्ध होणार आहे, याची माहिती आदल्या दिवशी नगरसेवकांना द्यायला हवी. त्यामुळे लसीकरणाचे नियोजन करणे सोपे होईल. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी प्रत्येक प्रभागात किमान दोन केंद्र हवे, अशी सूचना केली. ‘स्पॉट लसीकरणा’वर भर देण्यात यावा. यासाठी मनपातर्फे व्हॅन उपलब्ध करून देण्यात याव्या. समन्वयासाठी प्रत्येक केंद्रावर एका केंद्रप्रमुखाची नियुक्ती करण्यात यावी. लस कोणी घेऊ नये, याबाबत एकाही केंद्रावर सूचना नाही. प्रत्येक केंद्रावर याबाबत ठळकपणे सूचना लावण्यात याव्या, असेही सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सुचविले. माजी स्थायी समिती सभापती श्री.विजय झलके, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल यांनीही बैठकीत सूचना केली. विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे यांनी लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याची सूचना दिली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सध्या चाचणी आणि लसीकरणासंदर्भात असलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. कोव्हिड रुग्णालय आणि तेथील बेड्सच्या संख्येबाबत सांगतानाच लवकरच पाचपावली आणि अन्य काही ठिकाणी कोव्हिड हॉस्पीटल सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली. १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाच्या नियोजनावरही त्यांनी प्रकाश टाकला. मनपा आयुक्त म्हणाले की १८ वर्षावरील १२ लाख लोकांना लस देण्यात येतील. दररोज मोठया प्रमाणात लसीकरण करण्यासाठी नियोजन करावे लागेल. फ्रंट लाईन वर्कर आणि आरोग्य सेवकांना लसीकरणाचा लाभ मिळाला आहे. लसीकरण करुन कोरोनावर नियंत्रण करु शकतो.
यावर निर्देश देताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, येणाऱ्या काळात खाटांची संख्या वाढेल. त्याचे योग्य समन्वयासाठी प्रत्येक कोव्हिड हॉस्पीटलमध्ये एक अधिकारी नेमण्यात यावा. ज्या हॉटेल्स, सभागृहात कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे त्या व्यवस्थापनाकडून तेथील व्यवस्था आणि शुल्काविषयी मनपाने २४ तासांच्या आत शपथपत्र घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. एका कोव्हिड केअर सेंटरमध्ये ३५ ते ४० हजारात रेमडेसीवीर उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली. कोव्हिड केअर सेंटरमध्ये रेमडेसीवीर ठेवण्यास परवानगी आहे का, याबाबतचे नियम तपासून ते चुकीचे असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून एक मोबाईल लॅब नागपुरात दाखल झाली आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी काही केंद्रांवर जी बंधने घालण्यात आली होती ती संबंधित लॅब सुरू झाल्यानंतर हटविण्यात यावी, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. मोठया प्रमाणात चाचणी करुन कोरोना विरुध्द युध्द जिंकू शकतो, असेही ते म्हणाले.
रेड झोनमध्ये समूह चाचणी
नागपूर शहरातील जे रेड झोन आहेत त्या झोनमध्ये समूह चाचणीचे नियोजन करण्यात यावे. नागपूर महानगरपालिकेकडे १० झोनच्या १० मोबाईल चाचणी व्हॅन आहेत. त्यासंदर्भातील नियोजन करून एकाच दिवशी दहाही व्हॅन एकाच झोनमध्ये पाठवून चाचणी करण्यात यावी. नगरसेवकांशी समन्वय ठेवून त्याबाबत नियोजन करण्यात यावे. त्याची माहिती दोन दिवस अगोदर त्या झोनमधील लोकांना विविध माध्यमातून पोहचविण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
लसीकरणासाठीही रेड झोनला ‘टारगेट’ करा
लसीकरणासाठीही रेड झोनला ‘टारगेट’ करता येईल का, त्यादृष्टीने विचार आणि नियोजन करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. लसीकरणाची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी. ज्या लसीकरण केंद्रावर प्रतिसाद कमी आहे, ते लसीकरण केंद्र इतरत्र हलविण्यात यावे. लसींच्या वाटपासंदर्भात एक ‘एसओपी‘ तयार करण्यात यावी, असेही निर्देश महापौरांनी दिले. रेल्वेच्या हॉलमध्ये हॉस्पीटल तयार करण्यासंदर्भात दक्षिण-पूर्व रेल्वेने हिरवी झेंडी दिली आहे. त्यासंदर्भातही लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
Source link