दहन घाटावरील लाकडांचे शुल्क ऐच्छिक करा


नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांची महापौर व आयुक्तांना मागणी


नागपूर : गोरगरीब, दुःखी, कष्टकरी व ज्यांची परिस्थिती बिकट आहे अशा व्यक्तींना दहन घाटावर लाकडे निःशुल्क मिळावेत यासाठी, मनपाच्या सर्व दहन घाटावरील लाकडांचे शुल्क ऐच्छिक करा, अशी मागणी प्रभाग २६(अ)चे नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी महापौर व आयुक्तांना एका पत्राद्वारे केली आहे.

दहन घाटावरील लाकडांचे शुल्क ऐच्छिक करून गरजूंना विनंतीनुरूप निःशुल्क लाकडे देण्यात यावे अ,शा मागणीचे पत्र ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी सोमवारी (ता.२६) महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले.

आजच्या या कोरोना वैश्विक महामारीच्या संकटात अनेकांनी जीव गमावला आहे. गोरगरीब, कष्टकरी लोकांना रुग्णालय, औषधोपचार, डॉक्टर यामध्ये होते नव्हते ते सर्व पैसे खर्च केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी दहन घाटावर लाकडांसाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात. आधीच आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या लोकांकडून अंत्यविधीसाठी सुद्धा शुल्क आकारणे हे त्यांच्या आर्थिक संकटात भर घालण्यासारखे आहे. महानगरपालिकेतर्फे यापूर्वी दहन घाटावर निःशुल्क लाकडे पुरविण्यात येत होते. आज परिस्थिती खूप भीषण झाली आहे. उपचारासाठी कुणाच्या खिश्यात पैसे राहत नाही.

अशा स्थितीत त्यांच्याकडून लाकडांसाठी शुल्क आकारणे उचित नाही. सध्याची ही परिस्थिती पाहता शहरातील सर्व दहन घाटावर लाकडांसाठी आकारण्यात येणारे शुल्क ऐच्छिक करण्यात यावे. ज्यांची पैसे देण्याची परिस्थिती नाही अशांना विनंतीनुरूप निःशुल्क लाकडे पुरविण्यात यावी व या संदर्भातील निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करावा, अशी मागणी ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.




Source link

Leave a Reply