देवेंद्र फडणवीसांवर कारवाई होणार?; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले संकेत


मुंबई: ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस यांना अडचणीचे ठरू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबतचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरील संभाव्य कारवाईचे संकेत दिले. यावेळी त्यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी का बोलावण्यात आले हे स्पष्ट केले. राज्यात ५० हजार रेमडेसिवीरचा साठा येणार, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्र आहे याची माहिती मात्र पोलिसाकडे नव्हती. सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्र दाखवले देखील नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले.

मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा शासकीय कामात हस्तक्षेप होता. त्यामुळे चौकशीत बाधा आली, असे सांगतानाच हे चुकीचे असून पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Source link

Leave a Reply