७ ते १२ मे दरम्यान पॉझिटिव्हिटीचा दर १२ टक्के : पुन्हा घसरण होण्याची शक्यता
नागपूर : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूर शहरात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येला तब्बल दोन महिन्यानंतर काही प्रमाणात ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे. पॉझिटिव्हिटीचा दर हा एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र ७ मे ते १२ मे या आठवड्यात हा दर १२.०२ टक्क्यांवर आल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात दुसरी लाट आली. रुग्णसंख्या वाढू लागली. या काळात चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या आठवड्यात ५०५९१ चाचण्या झाल्या आणि ५८७२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. पॉझिटिव्हिटीचा हा दर ११.६१ टक्के होता. यानंतर ही टक्केवारी वाढतच राहिली. ५ ते ११ मार्च या कालावधीत ४८१६१ चाचण्या झाला. ८७०० पॉझिटिव्ह (१८.०६ टक्के) रुग्णांची नोंद झाली. १२ ते १८ मार्च दरम्यान ६४९०३ चाचण्या तर १५६७५ रुग्ण पॉझिटिव्ह (२४.१५ टक्के), १९ ते २५ मार्च या आठवड्यात ७५१९९ चाचण्या १८९३३ पॉझिटिव्ह (२५.१८ टक्के), २६ मार्च ते १ एप्रिलदरम्यान ६८२५२ चाचण्या आणि १५६८३ रुग्ण पॉझिटिव्ह (२२.९७ टक्के), २ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान ७३५२३ चाचण्या झाल्या. २०७३२ (२८.३ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. यानंतर ९ ते १५ एप्रिलदरम्यान ९७०५७ चाचण्या झाल्या. २७५२३ रुग्ण पॉझिटिव्ह (२८.३६) आले. १६ ते २२ एपिल दरम्यान १०४४६० चाचण्या झाल्या. ३२६४६ रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. ही टक्केवारी ३१.२५ टक्के इतकी होती. जी दुसऱ्या लाटेत सर्वाधिक गणली गेली. यानंतर मात्र पॉझिटिव्हिटीच्या टक्केवारीत घट व्हायला सुरुवात झाली. २३ ते २९ एप्रिल या आठवड्यात सर्वाधिक १२३४३४ चाचण्या झाल्या. ३०००३ रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. ही टक्केवारी २४.३१ इतकी होती. ३० एप्रिल ते ६ मे या आठवड्यात ११०६०२ चाचण्या झाल्या. १९९७७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्हिटीची ही टक्केवारी १८.०६ इतकी होती. आता मागील आठवड्यात टक्केवारी १२.०२ इतकी झाली. म्हणजेच मागील तीन आठवड्यांपासून प्रत्येक आठवड्यात पॉझिटिव्हिटीचा दर सहा टक्क्यांनी कमी होतो आहे.
कडक निर्बंधांचा परिणाम
दुसऱ्या लाटेमुळे नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला होता. यामुळे शहरात प्रथम मनपा प्रशासनाने आणि नंतर शासनाने कडक निर्बंध लावले. गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली. बाजारपेठा बंद करण्यात आल्या. यामुळे संसर्ग थांबण्यास मदत झाली. आता ३१ मे पर्यंत कडक निर्बंध वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात पॉझिटिव्हिटीचा दर अत्यंत कमी होईल, असा विश्वास मनपा प्रशासनाने व्यक्त केला.
Source link