“महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
उपराजधानी नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा महाउद्रेक सुरु आहे. दिवसाआड कोरोनाबाधितांचा रेकॉर्डब्रेक होत आहे. त्यामुळे खाटांची संख्या कमी पडत आहे. मेडिकल, मेयो, लता मंगेशकर हॉस्पीटलसारख्या मोठ्या तसेच इतर खाजगी रुग्णालयात खाटाच शिल्लक नाहीत. दर तासाला जवळपास ३०० लोक बाधित होत आहेत. मृत्यूंचा आकडा वाढतच आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. कोरोना प्रकोपामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे. रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करूनही खाटा मिळत नाहीत. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे दुसरीकडे तात्पुरते रुग्णालय उभारणे शक्य होत नाही. विक्रमी चाचण्यांची नोंद होत आसतांनाच विक्रमी बाधित समोर येत आहेत.
दरम्यान, नागपूरमध्ये औषधांचा, आयसीयु आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवतो आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. आपल्या रुग्णांसाठी इंजेक्शन घेण्यासाठी शहरात मेडीकल स्टोर्सबाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. नागपूरमधील रुग्णालयांत खाटा उपलब्ध नाहीत.. ही परिस्थिती नेमकी कशामुळे ?
असे निदर्शनास येते की, नागपूरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढसारख्या परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. तेथील आरोग्यसेवेच्या तुलनेत नागपूरची आरोग्यसेवा सरस असल्यामुळे तिथल्या रुग्णांचा नागपूरच्या आरोग्यसेवेवर अधिक विश्वास आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, याचा फटका नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना बसत आहे. अधिकांश रुग्णालयांमध्ये परप्रांतातील रुग्ण सेवा घेत असल्यामुळे इथल्या रुग्णांना भरती उपचार सेवेपासून मुकावे लागत आहे, त्रास सहन करावा लागत आहे. ही वस्तूस्थिती आहे. आप-आपल्या राज्यातील आरोग्य सेवेत सुधारणा केल्यास तेथील रुग्णांना नागपूरला यायची गरज पडणार नाही.
वेळीच उपाय-योजना केल्या गेल्या नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जोपर्यंत कोरोनाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांना प्राधान्य देऊन शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात आधी भरती करावे. रहिवासी दाखला म्हणून आधारकार्डचा वापर करावा”, असे मत माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांनी कोरोनाला न घाबरता वारंवार हात धुणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी न करणे आदि नियमांचे पालन करावे जेणेकरून कोरोनावर नियंत्रण ठेवता येईल, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.






















Source link