नागपूर : काल नागपूरने कोरोना बाधित रुग्णांचा उच्चांक गाठला असून एकाच दिवसात तब्बल 4 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले. शासकीय रुग्णालये हाऊसफुल्ल झाले असून अनेक गोर-गरीब रुग्ण उपचारा अभावी किंवा योग्य मार्गदर्शना अभावी दगावत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे गोर-गरीब मजूरवर्गाचे हाल, त्यामुळे अत्यंत विकट स्थिती आज नागपुरात आहे. अशा संकटाच्या स्थितीत नागपूरकरांना दिलासा देण्याऐवजी पालकमंत्री नितीन राऊत तामिळनाडू येथे प्रचारात व्यस्त आहे. करिता माझी विनंती आहे की, पालकमंत्री साहेब कॉंग्रेसमध्ये अनेक धुरंधर नेतेमंडळी आहेत. आपण नागपुरात परत या. नागपूरकरांना दिलासा द्या.
गोर-गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात मुख्यमंत्री सहायता निधीतून सुविधा द्या
शासकीय रुग्णालयात गर्दी होत असून प्रत्येकांना ऑक्सिजन पुरविणे कठीण झाले असताना गोर-गरीब रुग्णांचे सर्वाधिक हाल होतात. अशा गंभीर रुग्णांना वेळीच ऑक्सिजन पुरविणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा प्रत्येक खाजगी रुग्णालयातले काही बेड ताब्यात घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचाराची सोय उपब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. अनेक उपाययोजना करण्याची आज गरज असताना नागपूरकरांना वा-यावर सोडून पालकमंत्री महोदयांचे तामिळनाडूला जाणे, हे समजण्या पलिकडचे आहे.
पालकमंत्री नाहीतर नागपुरातील बाकीचे मंत्री कुठे आहेत?
मागील काळात कोविडमुळे लॉकडाऊन असताना गृहमंत्री रस्त्यावर उतरून नागरिकांना दिलासा देत होते. स्वत: फिरून लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेत होते. आता मात्र एकही वेळा त्यांनी कोविडवर प्रशासनाला किंवा नागरिकांना मार्गदर्शन केले नाही. रस्त्यावर येणे तर दूरच साधे उच्चारण देखील ते करू शकले नाही. लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण आपली खुर्ची काशी वाचेल. याकडेच त्यांचे लक्ष आहे. एकही मंत्र्यांने उच्चस्तरीय बैठक घेण्याचे धाडस नागपुरात केले नाही. या मंत्र्यांनी तरी पालकमंत्री यांच्या अनुपस्थितीत नागपूर सांभाळून घ्यावे, ठोस उपाययोजना कराव्यात व नागपूरला या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपुरातील मंत्री महोदयांना केलेली आहे.
Source link