महापौर दयाशंकर तिवारी यांचे मंगल कार्यालय संचालकांना आवाहन
नागपूर : शहरात सुरू असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळता यावी व त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळता यावी यासाठी शहरातील सर्व मंगल कार्यालये लसीकरणासाठी मनपाला उपलब्ध करुन देण्यात यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
गुरुवारी (ता.१३) शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोजच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. मंगळवारी झोन अंतर्गत झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुध्दा ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू होते. केंद्रावर जागेची उपलब्धता कमी असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात नागरिकांच्या मनपाकडे तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या.
यावर दखल घेत नागरिकांच्या व्यवस्थेकरिता स्थानिक रहिवासी सचिन राऊत यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली. मनपाच्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत सचिन राऊत यांनी त्यांचे पांडुरंग मंगल कार्यालय लसीकरणासाठी खुले करून दिले. सचिन राऊत यांच्या पुढाकारामुळे परीसरातील सर्व नागरिकांचे सुरळीत लसीकरण सुरु असून नागरिकांना होणारा त्रास सुद्धा कमी झाला आहे.
नागपूर शहरातील सर्व मंगल कार्यालय संचालकांनी असेच पुढाकार घेऊन मनपाला लसीकरणासाठी आपले मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना होत असलेला त्रास कमी होईल व लसीकरण सुरळीतपणे पार पडेल. त्यामुळे शहरातील सर्व मंगल कार्यालय संचालकांनी नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने आपले मंगल कार्यालय मनपाला लसीकरणासाठी उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
Source link