‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. आशीष दिसावल आणि डॉ. शहनाज चिमठानवाला यांचे आवाहन
नागपूर : कोरोनाचे संकट जसजसे वाढत आहे. तसे यासंबंधीची भीती, अफवा आणि संभ्रमही वाढत आहे. या सर्वांमध्ये कोव्हिड लस ही सकारात्मक व उर्जा देणारी बाब आहे. लसीसंदर्भातही अनेक नकारात्मक संदेश पसरविले जात आहेत, ही चुकीची बाब आहे. लस पूर्णत: सुरक्षित आहे त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्या प्रत्येकाने आवर्जुन लस घ्यावी, असे आवाहन शहरातील प्रसिद्ध कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. आशीष दिसावल आणि प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. शहनाज चिमठानवाला यांनी केले आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात मंगळवारी (ता.३०) डॉ.आशीष दिसावल आणि डॉ.शहनाज चिमठानवाला यांनी ‘गृह विलगीकरण आणि लसीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले व नागरिकांच्या शंकांचे निरसरण केले.
कारोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’मध्ये राहणे आणि कुणाच्या संपर्कात आले असल्यास स्वत: ‘क्वारंटाईन’ होणे ही बाब अत्यावश्यक आहे. हे निर्बंध आपण स्वत:च स्वत:ला जबाबदारीने घालून देणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि खबरदारी हे कोव्हिड विरुद्धच्या लढातील सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे आपली वागणूक ही जबाबदारीची असावी. याशिवाय आज आपल्याकडे ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ अशा दोन लसही उपलब्ध आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे यावे. लसीकरणामुळे कोरोना होत नाही, हा समज जरी चुकीचा असला तरी कोरोना झाल्यास त्याची तीव्रता मात्र सौम्य स्वरूपातच राहते. त्यामुळे लस ही कोरोनापासून शंभर टक्के बचाव करत नसली तरी कोरोनापासून लढण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण करते. याशिवाय आवश्यक बाब म्हणजे, नियमांचे पालन. लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतरही आपणा सर्वांना ‘एसएमएस’ या सॅनिटायजिंग, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग या त्रीसूत्रीचा अवलंब करणे अनिवार्य आहे, असेही डॉ.आशीष दिसावल आणि डॉ.शहनाज चिमठानवाला यांनी सांगितले.
आजच्या काळातील सर्वात धोकादायक आजार कोरोना आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने तो झपाट्याने पसरत आहे. सुरक्षा घेणे, नियमांचे पालन करणे हाच यापासून बचावाचा उपाय आहे. त्यामुळे याबाबत प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. आज प्रत्येक घरामध्ये ‘थर्मामीटर’ व ‘पल्स ऑक्सिमीटर’ असणे आवश्यक आहे. या बाबी आपल्याला संभाव्य धोक्यापासून वाचवू शकतात. ‘६ मिनिट वॉक टेस्ट’ ही प्रत्येकानेच करावी. ‘६ मिनिट वॉक टेस्ट’ नंतर जर ऑक्सिजनची मात्र ९५च्या खाली दाखवित असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय ‘हॅपी हायपोक्सिया’ याविषयीही अधिक सजग राहावे. शरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी होणे म्हणजे ‘हॅपी हायपोक्सिया’. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यानंतरही रुग्णाला काहीही जाणवत नाही, त्याला आपण स्वस्थ आहोत असे वाटते, परंतू ऑक्सिजनची मात्रा कमी झालेली असते. हे अत्यंत धोकादायक आहे. शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे ‘ऑक्सिमीटर’वरून ऑक्सिजनचे प्रमाण तपासत राहावे, असेही डॉ.आशीष दिसावल आणि डॉ.शहनाज चिमठानवाला यांनी सांगितले.






















Source link