नागपूर, : शहरात झपाट्याने कोव्हिडचा संसर्ग वाढत आहे. अनेक रूग्ण घरी आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र लक्षणे असूनही चाचणीसाठी पुढे न येणा-यांचीही संख्या मोठी आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे निर्माण होणारा धोका मोठा आहे. यापासून बचावासाठी स्वत:ची योग्य सुरक्षा हेच मोठे शस्त्र आहे. आपल्यामुळे इतर कुणाच्या जीवाला धोका निर्माण होउ नये यासाठी लक्षणे असल्यास किंवा कुणाच्या संपर्कात आलेले असल्यास कुठलीही भीती न बाळगता चाचणीसाठी पुढे या, असे आवाहन प्रसिद्ध कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय देवतळे आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ तथा श्रीकृष्ण हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. महेश फुलवाणी यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरूवारी (ता.१) डॉ. संजय देवतळे व डॉ. महेश फुलवाणी यांनी मार्गदर्शन केले व नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देउन शंकांचे निरसरन केले.
लक्षणे नसलेल्या रुग्णांनी १७ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक असून अँटीजेन चाचणी जर निगेटिव्ह आली तर बाहेर कुठेही न फिरता गृह विलगीकरणातच राहावे. अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्ण हा पॉझिटिव्हच असतो मात्र अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते. त्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली म्हणून बेजबाबदार वागणूक टाळा. याशिवाय कोरोचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास लगेच दुस-या लॅबमधून चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आल्याचे दाखविण्याचेही अनेक प्रकार केले जातात. कोरोनाचा अहवाल एकदा पॉझिटिव्ह आल्यास लक्षणे नसलेल्यांनी १७ दिवसांचा ‘आयसोलेशन’चा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचे पालन करावे. कोणतीही लक्षणे आढळल्यास ‘गूगल’ करून स्वत:च्या मनाने उपचार करणेही धोकादायक आहे. स्वत:च स्वत:चे डॉक्टर बनू नका, आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती द्या व सल्ला घ्या, असेही डॉ. संजय देवतळे व डॉ. महेश फुलवाणी यांनी सांगितले.
कोरोना हा योग्य वेळेवर उपचाराने पूर्ण बरा होतो. त्यामुळे कुठलीही लक्षणे दिसत असल्यास चाचणीसाठी पुढे या. आजार अंगावर काढून धोका निर्माण करू नका. त्वरीत निदान व त्यामुळे मिळाणारे वेळेवरचे उपचार हे आपला जीव वाचविणारच शिवाय आपल्यामुळे इतरांना होणारा धोकाही टाळणार आहे. त्यामुळे जबाबदारीने वागा व नियमांचे पालन करा, असेही आवाहन डॉ. संजय देवतळे यांनी केले.
सॅनिटाजर, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग या ‘एसएमएस’च्या त्रीसूत्रीमध्ये आता कोव्हिड लसचा समावेश झालेला आहे. लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. लसीसंदर्भात सोशल मीडियावर कुठलेही चुकीचे संदेश प्रसारित करू नका, त्यावर विश्वास ठेवू नका. शासनाकडून ज्यांच्यासाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्या सर्वांनीच लसीकरणासाठी पुढे यावे. याशिवाय हृदयासंबंधी जे काही आजार असणा-या सर्वांनी आवर्जुन लस घ्यावी, त्यापूर्वी आपल्या नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. महेश फुलवाणी यांनी केले.
Source link