महापौरांनी केली आयुष दवाखान्याची पाहणी


ऑक्सीजन प्लान्ट लावण्याची शक्यता पडताळली

नागपूर : मनपा संचालित करीत असलेल्या हॉस्पीटलला कोव्हिड हॉस्पीटल करून तेथे ऑक्सीजन प्लान्ट उभारण्यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी शहानिशा करीत आहेत. याच मोहिमेअंतर्गत गुरुवारी (ता. २२) त्यांनी सदर येथील आयुष दवाखान्याची पाहणी करून ऑक्सीजन प्लान्ट कोठे स्थापित करू शकतो, याबाबतच्या शक्यता पडताळल्या.

आयुष दवाखान्यात भेट देऊन महापौर दयाशंकर तिवारी यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या दवाखान्यात सध्या ४८ बेड कार्यान्वित आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून येथे एन.आय.व्ही. मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आयुष दवाखान्यात तज्ज्ञ नसल्याने मनपाच्या ज्या दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टर असेल तेथे ही मशीन देण्यात येईल. नसेलच तर मेडिकल अथवा मेयोमध्ये ही मशीन पाठविण्यात येईल, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

आयुष रुग्णालयात ऑक्सीजन प्लान्ट लावण्यासंदर्भात तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी जागेसंदर्भात चर्चा केली. प्लान्ट कुठे लावू शकतो, याबाबत सर्व शक्यता त्यांनी पडताळल्या. दवाखान्यात ज्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्याबाबतही चर्चा झाल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

दरम्यान, कोव्हिडची सध्याची परिस्थिती बघता आरोग्य यंत्रणा सक्षम आणि बळकट करण्याच्या दृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाचपावली आणि केटी नगर येथे ऑक्सीजनची व्यवस्था करून कोव्हिड हॉस्पीटल तातडीने सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी त्यांनी एम.आय.डी.सी. तील इंस्टालेशनच्या प्रतीक्षेत असलेल्या ऑक्सीजन प्लान्टला इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालयात स्थापित करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली. या सर्व व्यवस्था पुढील काही दिवसांतच रुग्णसेवेत दाखल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांचासोबत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन उपस्थित होते.




Source link

Leave a Reply