लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात – पालकमंत्री
नागपूर: आजपासून राज्यात सर्वत्र 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी. तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सशस्त्र पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्विकारली.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह उपायुक्त चंद्रभान पराते, सहाय्यक आयुक्त हरीष भामरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात कोरोना उपाययोजनांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वारंवार हात धुवा, मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा. कोविड त्रिसुत्रीच्या आधारेच कोरोनावर मात करता येईल, असे त्यांनी सांगितले.
लसीकरण हाच कोरोनावर रामबाण उपाय आहे. आजपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून शांत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
Source link