नागपूर : नागपूर शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरणाची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांना अनुमति दिली तर यावर नियंत्रण करण्यात मदत होईल, त्यामुळे पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर नागपूर शहरात देखील खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केन्द्र सुरु करण्याची परवानगी दयावी, अशी मागणी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांना एका पत्राव्दारे केली आहे.
महापौरांनी नमूद केले की, मुंबई आणि पुणे शहरामध्ये लसीकरणासाठी योग्य व्यवस्था, लस साठवण्याकरीता कोल्ड चेन स्पेस, लसीकरणासाठी प्रशिक्षित चमू आणि १०० खाटांचे रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. अश्याच प्रकारे निकष पूर्ण करणा-या नागपूरातील रुग्णालयांना परवानगी दिल्यास जास्तीत-जास्त लसीकरण करणे शक्य होईल. त्यामुळे नागपूर मनपाचे आयुक्त यांनी ४ मार्च ला एका पत्राव्दारे खाजगी रुग्णालयांना अनुमति देण्याची विनंती केली होती. परंतु याबाबत आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
आता केन्द्र शासनाचे निर्देशाप्रमाणे १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने जर खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली तर जास्तीत-जास्त नागरिकांना लस दिली जाऊ शकते आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. त्यादृष्टीने महापौरांनी केन्द्रीय आरोग्य मंत्रालयाकडे या संबंधात चर्चा केली असता त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाकडून नागपूर महानगरपालिकेचा कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही.
महापौरांनी स्पष्ट केले की आम्ही नागपूरसाठी काही वेगळी मागणी करत नाही. फक्त जे मुंबई आणि पुण्याला दिले तशीच परवानगी नागपूर मध्येही देण्यात यावी. याबाबत मा.मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेऊन उपराजधानीतील जनतेला दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
2 Attachments
Source link