राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाण्ट निर्माण करावे : ना. गडकरी - Expert News
Nagpur

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाण्ट निर्माण करावे : ना. गडकरी

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाण्ट निर्माण करावे : ना. गडकरी
Written by Expert News

धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सीजन प्लाण्टचा शुभारंभ

नागपूर: कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सीजनचा प्लाण्ट निर्माण करण्यास प्रोत्साहन द्यावे. तसेच 50 पेक्षा अधिक रुग्णशय्येच्या हॉस्पिटलला ऑक्सीजन प्लाण्ट बंधनकारक करण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सीजन प्लाण्टचा शुभारंभ आभासी कार्यक्रमात करण्यात आला. इथेनॉलपासून ऑक्सीजन निर्मितीच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ना. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, या कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- साखर कारखान्यांची स्थिती सध्या फारशी चांगली नाही. डिस्टिलरी बंद करून ऑक्सीजन निर्मिती करणे फायद्याचे ठरत नाही, तर ऑक्सीजन निर्मिती हे ‘बाय प्रॉडक्ट’ असेल तर ते फायदेशीर ठरते. विदर्भात आता 12 ऑक्सीजन प्लाण्ट सुरु करण्याचा आपला प्रयत्न आहे. यापैकी 1 प्लाण्ट उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. वेकोलिनेही आपल्या सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर आणि नागपुरात ऑक्सीजन प्लाण्टसाठी मदत केली आहे, असेही ते म्हणाले.

राज्यातील 50 पेक्षा अधिक रुग्णशय्या असलेल्या हॉस्पिटलला ऑक्सीजन प्लाण्ट बंधनकारक करण्याची सूचना ना. गडकरी यांनी यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केली. स्टील प्लाण्टमध्ये ऑक्सीजन हा ‘बाय प्रॉडक्ट’ आहे. 5 कोटीत एका जिल्ह्यात प्लाण्ट सुरु होऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्यात असे प्लाण्ट सुरु झाले पाहिजेत. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली असताना स्टील प्लाण्टच्या भरोशावर आपण राहू शकत नाही. महिनाभरात प्रत्येक जिल्हा ऑक्सीजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. रेडमेसीवीरची आता कमी नाही. पण ब्लॅक फंगसचे खूप भयंकर परिणाम आहेत. शासनाने जीवनदायी योजनेत याचा समावेश केला हे चांगले झाले. पण या रोगावर औषध सर्वांना परवडेल अशा भावात उपलब्ध होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असेही ना. गडकरी म्हणाले.Source link

About the author

Expert News

Leave a Reply

%d bloggers like this: