मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन
नागपूर : मागील वर्षी कोरोना हा विषाणू आपल्यासाठी नवीन होता. संसर्गजन्य असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि हातांची स्वच्छता ह्या नियमांचे पालन हाच उपाय आपल्याकडे होता. आता त्याच्या जोडीला कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाने अगत्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय आहे, असे प्रतिपादन आय.एम.ए.चे सहसचिव डॉ. समीर जहांगीरदार आणि डॉ. सुषमा ठाकरे यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. ‘कोव्हिड लसीकरण’ या विषयावर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. डॉ. सुषमा ठाकरे म्हणाल्या, नागपुरात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लस उपलब्ध आहेत. दोन्ही लसी सारख्याच परिणामकारक आहेत. त्यामुळे या लसींविषयी शंका मनात ठेवण्याचे काहीही कारण नाही. लसीकरणासाठी ज्या केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्या. मात्र ज्या लसीचा पहिला डोज घेतला आहे, त्याच लसीचा दुसरा डोज घ्यावा लागेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. लसीकरणामुळे कोणाला त्रास झाल्याची प्रकरणे एक टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. लसीचे दोन्ही डोज घेतल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. लस घेतल्यानंतरही जर कोरोना पॉझिटिव्ह कोणी येत असेल तर त्याची तीव्रता अत्यंत कमी असते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यात कोरोना हद्दपार करायचा असेल तर हर्ड इम्युनिटी वाढवावी लागेल आणि त्यासाठी लसीकरण प्रत्येकाने करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. समीर जहांगीरदार म्हणाले, केंद्राने लसीकरण टप्प्याटप्प्यांमध्ये सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सला लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील अतिगंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या दिशानिर्देशानुसार जे-जे लाभार्थी आहेत, त्यांनी लस अवश्य घ्यावी. लस घेतल्यानंतरही कोरोनासंबंधित असलेल्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
फेसबुक लाईव्हदरम्यान नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही दोन्ही तज्ज्ञांनी उत्तरे दिलीत. लसीकरणासंदर्भात असलेल्या शंकांचे निरसन केले.






















Source link