विद्यार्थ्यांसोबत पालकांना दुचाकीवर परवानगी - Expert News

विद्यार्थ्यांसोबत पालकांना दुचाकीवर परवानगी


महापौरांनी केली पोलिस आयुक्तांशी चर्चा : नागरिकांना नियम पाळण्याचे केले आवाहन

नागपूर : सध्या परिक्षेचे दिवस आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वाचनालय, अध्ययन कक्ष, अभ्यासिका येथे जाणे येणे करावे लागते. शिवाय परिक्षांच्या दृष्टीने तयारीसाठी शाळा, महाविद्यालयांतही जाण्याची गरज पडते. विद्यार्थ्यांजवळ वाहन परवाना नसतो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पालकांना विद्यार्थ्यांची दुचाकीवर सोबत करण्यास परवानगी द्यावी ह्या मुद्यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. यावर सकारात्मक निर्णय घेत आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत दुचाकीवर पालकांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे आल्या होत्या. दहावी, बारावीच्या परिक्षेचे दिवसं लक्षात घेता त्यांची गैरसोय होऊ नये, या भावनेतून महापौरांनी सोमवारी (ता. १५) पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची व्यथा त्यांना सांगितली. महापौरांसोबत झालेल्या चर्चेत पोलिस आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेत आता विद्यार्थ्यांना दुचाकीवर घेऊन जाण्यास पालकांना परवानगी दिली आहे. महापौरांचे प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

नियम पाळा, लॉकडाऊन टाळा!
दरम्यान, महापौर दयाशंकर तिवारी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशीही संवाद साधला. लॉकडाऊन हा नागरिकांच्या हिताचा नाही. त्याविरुद्ध आपण एकत्रित आवाज उठवतो. मात्र, शासनाच्या नियमांचे, दिशानिर्देशांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. ते आपण करत नाही म्हणून लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्‌भवते. मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर नागरिकांना नियमांचा विसर पडला. परिणामी कोरोना विषाणू वेगाने वाढू लागला.

आता पुन्हा दररोज हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले. ही परिस्थिती उद्‌भवण्यास आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे किमान आतातरी नियम पाळावे. दुकानदारांनी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना दुकानात प्रवेश देऊ नये. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी सातत्याने मास्कचा वापर करावा. हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावे अथवा सॅनिटाईज करावे, जेणेकरून भविष्यात लॉकडाऊन टाळता येईल, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.



Source link

Leave a Reply

%d bloggers like this: