सावधगिरी उत्तम उपाय; उपचार कठीण पर्याय


मनपा-आय.एम.ए. आयोजित ‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात तज्ज्ञांचा सल्ला

नागपूर : सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे मृत्यु झाल्याने अनेक कुटुंबांवर भावनिक आघात झाला आहे. ही परिस्थिती पुन्हा ओढावू नये यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटाईझर आणि सोशल डिस्टंन्सिंग या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असेल तर सावधगिरी हाच उत्तम उपाय आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वच जण तुटले आहेत. त्यामुळे दवाखान्यात जाऊन उपचार करणे हा सर्वात कठीण पर्याय आहे. त्यामुळे नियम पाळा, कोरोनाला टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सहकार्याने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी (ता. २८) श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. विक्रम राठी आणि अतिदक्षता विशेषज्ञ डॉ. राजन बारोकर सहभागी झाले होते. ‘कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या’ या विषयावर बोलताना डॉ. राजन बारोकर म्हणाले, कोव्हिडची ही दुसरी लाट अत्यंत वाईट आहे. या लाटेत युवा रुग्ण अधिक आढळत आहेत.

अनेक जण लक्षणं असतानाही दुर्लक्ष करीत आहे. त्रास वाढल्यानंतर डॉक्टरकडे जातात. त्यातून ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होते आणि तोपर्यंत बराच वेळ झालेला असतो. लक्षणे नसल्यामुळे अनेक रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळेही अनेक जण रुग्णालयात जाणे टाळत आहे. यावेळी एकाच घरातील तीन-चार रुग्ण असल्यामुळे तो ताणसुद्धा त्यांच्यावर पडतो आहे. पैशाचा विचार करून डॉक्टरांचा सल्ला न घेणे, रुग्णालयात दाखल न होणे यामुळेही रुग्णसंख्या वाढ होत असल्याचे डॉ. बारोकर यांनी सांगितले.

डॉ. विक्रम राठी म्हणाले, कोरोनाच्या या लाटेत फुप्फुसांचा त्रास होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही उद्‌भवणारे त्रास भरपूर आहे. आज चांगले असलेल्या रुग्णाची दोन दिवसानंतर काय परिस्थिती राहील, हे सांगताच येत नाही, असे या लाटेत दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लसीकरण हा आता एकमेव पर्याय आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेतल्यास हर्ड इम्यनिटी तयार होण्यास मदत होईल. लस घेतल्यानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, हे सांगतानाच गृहविलगीकरणात असलेल्या लोकांनी नेमके काय करावे, कशावर लक्ष ठेवावे याविषयीही विस्तृत मार्गदर्शन केले. लाईव्हदरम्यान नागरिकांकडून आलेल्या प्रश्नांनाही डॉक्टरद्वयींनी समर्पक उत्तरे दिली.




Source link

Leave a Reply