आपली बस सेवेतील २५ मिनी बसेसचे रुग्णवाहिकेमध्ये परिवर्तन


रुग्णांच्या नि:शुल्क सेवेसाठी मनपाचा पुढाकार : २४ तास राहणार सेवारत

नागपूर : कोरोनाच्या या संकटाच्या प्रसंगी अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही. मिळाली तरी दोन ते तीन किमी अंतराचे हजारो रूपये मोजावे लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनेक तक्रारींवर गांभीर्याने दखल घेत नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपाच्या ‘आपली बस’ सेवेतील २५ मिनी बसेस रुग्णवाहिकेमध्ये परिवर्तीत करण्यात आलेल्या आहेत. महापौर श्री.दयाशंकर ‍तिवारी यांच्या संकल्पनेतून व परिवहन समितीचे माजी सभापती तथा परिवहन समिती सदस्य श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या पुढाकारातून रुग्णवाहिकेमध्ये परिवर्तीत झालेल्या या बसेसचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी (ता.३) मनपा मुख्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले.

याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सदस्य जितेंद्र कुकडे, आरोग्य समिती सभापती महेश महाजन, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, परिवहन विभागाचे अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिपुरडे, योगेश लुंगे, विनय भारद्वाज आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी रुग्णवाहिकांचे लोकार्पण करीत रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेकरिता असलेले ०७१२-२५५१४१७, ९०९६१५९४७२ हे संपर्क क्रमांक जारी केले. ते म्हणाले, काही दिवसांपासून सोशल मीडियावर रुग्णवाहिकांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. दोन ते तीन किमी अंतरासाठी रुग्णवाहिका पाच ते सहा हजार आणि चार ते किमी करिता पंधरा हजारावर शुल्क आकारात असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या. आजच्या या संकटाच्या स्थितीत कुणी परिस्थितीमुळे रुग्णालयापर्यंत पोहोचू शकला नाही अशी कुणावर वेळ येउ नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने तात्काळ भूमिका घेत मनपाच्या आपली बस सेवेतील २५ मिनी बसेसचे रुग्णवाहिकेमध्ये परिवर्तन केले आहे. या कठीण प्रसंगामध्ये रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेता परिवहन समिती सदस्य व माजी सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी आपली बस सेवेतील मिनी बसेसला रुग्णवाहिकेमध्ये परिवर्तीत करण्यासाठी पुढाकार घेतला. या संकल्पनेला मनपा प्रशासनाने सकारात्मक घेत तातडीने या संदर्भात कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे केवळ १० दिवसात मनपाच्या २५ मिनी बस नि:शुल्क रुग्णवाहिकेची सेवा देण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसमधील वाहकांना मनपाच्या डॉक्टरांमार्फत ऑक्सिजन लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

या रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी परिवहन विभागामध्ये कक्ष स्थापन करण्यात आले असून येथील ०७१२-२५५१४१७, ९०९६१५९४७२ या क्रमांकांवर संपर्क साधून नि:शुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल. आरोग्य विभागावर असलेला ताण लक्षात घेता या रुग्णवाहिकेबाबत परिवहन विभागामध्ये वेगळी यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. या व्यवस्थेचे प्रमुख गिरिश महाजन आहे. श्री. जितेन्द्र (बंटी) कुकडे यांनी सांगितले की परिवहन विभागामार्फत बस ऑपरेटरांना निर्देश देण्यात आले आहे की बस चालक आणि वाहकांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा आरोग्य बीमा काढण्यात यावा. जर वाहन चालक किंवा वाहकाला कोरोना झाला तर त्याला बीमेचा लाभ मिळेल. रुग्णवाहिकेसाठी सेवा देणारे सर्व चालक व वाहक कोव्हिड योद्धा म्हणून सेवारत राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, नागरिकांना २४ तास रुग्णवाहिकेची सेवा मिळावी यासाठी २५ रुग्णवाहिकांच्या संचालनासाठी ७५ चालक व ७५ वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वाहक व चालकाची ६ तासाची कामाची पाळी असणार आहे.




Source link

Leave a Reply