कविवर्य सुरेश भट सभागृहात अत्याधुनिक सिनेमॅटिक स्क्रीन


ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचा पुढाकार

नागपूर : रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या आधुनिकतेत भर घालणाऱ्या सिनेमॅटिक स्क्रीनचे लोकार्पण प्रख्यात मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (ता.१४) आयोजित दिमाखदार सोहळ्यात पार पडले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर, आमदार प्रवीण दटके, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. मिलिंद माने, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, सदस्य मधुप पांडेय, अतुल शिरोडकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे उत्तम उदाहरण : ना. नितीन गडकरी
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहराच्या सांस्कृतिक विकासात खासदार सांस्कृतिक महोत्सव मैलाचा दगड ठरला आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह जनतेचे सभागृह आहे. त्याचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला व्हावा, या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पुढाकार घेतला.

सभागृहात थिएटरचा लाभ घेता यावा या उद्देशाने यूएफओ मूव्हीजच्या माध्यमातून सभागृहाला सिनेमॅटिक स्क्रीन भेट देण्यात आली. या स्क्रीनवर आता शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्याना स्फुरण चढविणारे चित्रपट, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीही त्यांना आवश्यक कार्यक्रमाचा लाभ या स्क्रीनवर आता घेता येईल. नागपूर महानगरपालिकेने याचा प्रत्येक घटकाला लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक घटकाला प्रशिक्षण देणारी ही शाळा ठरावी, असे ते म्हणाले.

नाट्य-चित्रपटगृह संकल्पना अस्तित्वात यावी : मकरंद अनासपुरे
याप्रसंगी बोलताना अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, नाट्यगृहात सिनेमॅटिक स्क्रीन ही संकल्पनाच अफलातून आहे. मराठी चित्रपटांना अशा प्रयोगाची खऱ्या अर्थाने गरज आहे. नाट्यगृहात दिवसाचे प्रयोग फार कमी असतात. अशावेळी कमी दरात मराठी चित्रपट दाखविले तर मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस येतील. भविष्यात नाट्य चित्रपटगृह अशी संकल्पना अस्तित्वात यावी, असेही ते म्हणाले.

मनपाची जबाबदारी वाढली : महापौर दयाशंकर तिवारी
याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नामदार नितीन गडकरो हे संकल्पनांचे भांडार आहे. कविवर्य सुरेश भट सभागृहात सिनेमॅटिक स्क्रीन लावून त्यावर विविध घटकांना प्रशिक्षण देण्याची त्यांची संकल्पना दूरदृष्टिकोनातून मांडलेली आहे. ही जबाबदारी मनपावर त्यांनी टाकल्याने आता मनपाची जबाबदारी अधिक वाढली आहे. मनपा ती निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.



Source link

Leave a Reply