कारवाई करा, अन्यथा चार दिवसात आंदोलनाची भूमिका घेणार : संदीप जोशी


८० आणि २० टक्के दराबाबत हॉस्पिटलकडून होत असलेल्या लुबाडणूक प्रकरणी मनपा आयुक्तांना इशारा

नागपूर : एकीकडे कोव्हिडच्या संसर्गाने नागपूरकर नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे मात्र खासगी रुग्णालये शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक करीत असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर तथा नगरसेवक संदीप जोशी यांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार ८० टक्के बेडवर शासकीय दरानुसार बिलाची आकारणी करण्याचे निर्देश असतानाही रुग्णालय व्यवस्थापन त्यांच्या दरानुसार देयके वसुल करीत आहेत. यात मनपाने नेमलेल्या ऑडिटरसोबतही रुग्णालयांनी संगनमत केले असून यामुळे सामान्य नागरिक भरडला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात लुबाडणूक करणा-या रुग्णालयांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी. अन्यथा येत्या चार दिवसात मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलनाची भूमिका घेउ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शासनाने नेमून दिलेल्या शासकीय दराने ८०टक्के बेड व रुग्णालय व्यवस्थापनाच्या दराने २० टक्के बेडची व्यवस्था करण्याच्या नियमाची पायमल्ली करून जनतेची होणारी लुबाडणूक रोखण्याच्या संदर्भाने माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याशी संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा देखील केली.

कोरोनाच्या या संकटकाळामध्ये उपचाराविना कुणाचीही हेळसांड होउ नये व प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाद्वारे खासगी रुग्णालयांकरिता ८० व २० टक्के दराचे धोरण राबविण्याचे निर्देश देण्यात आले. शासनाच्या या नियमानुसार रुग्णालयातील एकूण बेड्सच्या ८० टक्के बेड हे शासनाने ठरवून दिलेल्या दराने तर २० टक्के बेड हे रुग्णालय व्यवस्थापनाच्या निर्धारित दराने रुग्णांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासंबंधात नागपूर शहरातील किती खासगी रुग्णालयांनी शासनाच्या या नियमानुसार बेड्स उपलब्ध करून दिले याची पाहणी करण्यासाठी शहरातील मनपाकडे नोंद असलेल्या सर्व १४९ रुग्णालयांची यादी माजी महापौर संदीप जोशी यांनी मागितली. उपलब्ध झालेल्या यादीमध्ये मागील दोन महिन्यांमध्ये ८० व २० टक्के नुसार रुग्णांच्या उपचारासंदर्भात ८५ खासगी रुग्णालयांची माहितीच उपलब्ध नसून उर्वरित ६४ रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी नियमाप्रमाणे काम केले असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

कोव्हिड रुग्णांच्या वाढिव बिला संदर्भात मागील काही दिवसांपासून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची शहानिशा केली असता अनेक खासगी रुग्णालयांनी ५० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण हे २० टक्के दरानुसारच दाखल केले असल्याचे स्पष्ट झाले. एकूणच जास्तीत जास्त रुग्ण हे रुग्णालय व्यवस्थापनाच्या दराने २० टक्के प्रमाणे दाखल करून सर्वसामान्यांची लुटमार केली जात आहे, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.

यासंपूर्ण प्रकरणामध्ये माजी महापौर संदीप जोशी यांनी काही आक्षेप नोंदवून महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यानुसार उपरोक्त संपूर्ण प्रकरणामध्ये मनपाद्वारे ऑडिटरची मिलीभगत सुरू आहे व त्यामुळे ज्या रुग्णालयांनी रुग्णालयाच्या दराने २० टक्के बेड भरण्याऐवजी ५० टक्केपेक्षा जास्त बेड्स भरले आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी. ज्या रुग्णालयांनी २० टक्केपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयाच्या दराने भरती करून त्या सर्व रुग्णांचे जास्तीचे घेतलेले पैसे परत करण्याचे रुग्णालयांना आदेश देण्यात यावे. वारंवार मागणी करूनही २० व ८० टक्के नुसार बेड भरल्याची अजुनही मनपाकडे माहिती सादर न करणा-या ८५ रुग्णालयांवर दंड ठोठावण्यात यावा. सर्व रुग्णालयांनी त्यांच्याकडे दाखल सर्व रुग्णांची संपर्क क्रमांकास माहिती मनपाकडे मागवून त्यामधील आकड्यांचा घोळ झाला अथवा नाही याची शहानिशा केली जावी व त्यातील सत्यता तपासण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांना केली.

कोरोनाच्या या संकटामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी काही हॉस्पिटल चांगले काम करीत असताना काही हॉस्पिटल रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकरणामध्ये मनपा प्रशासनाच्या कारवाईबाबत नकारात्मक संदेश पसरविला जात असल्याने चुकीचे काम करणा-या रुग्णालयांचे धैर्य वाढत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाबाबत कठोर कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला जावा, अशी मागणी करतानाच मनपाद्वारे येत्या तीन दिवसात कुठलिही कारवाई प्रारंभ न झाल्यास त्यापुढील दिवशी आपण स्वत: मनपा प्रशासनाविरोधा आंदोलनाची भूमिका घेउ, असा सज्जड इशाराही माजी महापौर संदीप जोशी यांनी दिला.
Source link

Leave a Reply