कोविड रुग्णांवरील उपचारासाठी अतिरिक्त


आरोग्य सेविका व डॉक्टरांची नेमणूक

भंडारा:- दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून वाढत्या रुग्ण संख्येचा आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने कोविड रुग्णांवरील उपचारासाठी अतिरिक्त आरोग्य सेविका व डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे कोविड रुग्णांना वेळेत उपचार देणे सोयीचे होणार आहे. नेमणूक करण्यात आलेले अनेक डॉक्टर व आरोग्य सेविका आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख अचानक वाढला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी डॉक्टर व अधिपरिचारिका यांना सेवा देण्याचे आवाहन केले होते. प्राप्त अर्जानुसार 22 डॉक्टर व 75 आरोग्य सेविकांना नेमणूक देण्यात आली आहे. 22 डॉक्टर मध्ये बीएएमएस व बिडीएस डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांची जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय साकोली, तुमसर, कोविड केअर सेंटर भंडारा, लाखनी व पवनी या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी काही डॉक्टर रुजू झाले असून उर्वरित डॉक्टर लवकरच रुजू होतील असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.

कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोविड रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी अधिक संख्येने अधिपरिचारिकांची आवश्यकता भासत आहे. यासाठी वारंवार जाहिरात देऊनही हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने 13 एप्रिलच्या आदेशानुसार 75 आरोग्य सेविकांची कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या कालावधीकरिता नियुक्ती केली आहे. त्यांची जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय साकोली, तुमसर, कोविड केअर सेंटर भंडारा, लाखनी व पवनी या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य विभागाला अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहेच. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत खाजगी डॉक्टर व अधिपरिचारिका तसेच आरोग्य सेविकांनी आपल्या सेवा शासनाला द्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरू असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत आहे. ही बाब लक्षात घेता एमबीबीएस झालेले विद्यार्थी, नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेले व डॉक्टर यांच्या सेवेची शासकीय आरोग्य विभागाला नितांत गरज आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील विषाणू अधिक तीव्र असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने इलाज होणे गरजेचे आहे. अशावेळी वैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ रुग्णांना होऊ शकतो असे त्यांनी नमूद केले. आरोग्य विभागाने नर्स भरतीसाठी यापूर्वी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता परिस्थिती कठीण होत असताना डॉक्टर व नर्स यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या सेवा द्याव्यात असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. शासकीय आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉक्टर सुद्धा आपल्या सेवा देऊ शकतात. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा यांच्याशी थेट संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. आपल्या सेवा गरीब व गरजू व्यक्तींना जीवन प्रदान करणाऱ्या ठरणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त डॉक्टर व नर्सनी आपल्या सेवा द्याव्यात असे ते म्हणाले.
Source link

Leave a Reply