कोविड लस ठरली पोलीस विभागासाठी ‘जीवन रक्षक’


·लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू नाही
·लस हेच जीवन रक्षक

भंडारा:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली असून फ्रंट लाईन वर्कर म्हणून पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून दुसऱ्या तीव्र अशा लाटेतही केवळ लसीकरणामुळे पोलीस विभागात एकही मृत्यू झाला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायम आघाडीवर असणाऱ्या पोलीस विभागाला ‘लस’ च्या रूपाने जीवन रक्षा कवच प्राप्त झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात आता पर्यंत पोलीस विभागातील 1454 अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर 1277 जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पहिला डोज घेतलेल्यापैकी 53 (3.57 टक्के) तर दुसरा डोज घेणाऱ्यापैकी 67 (5.24 टक्के) कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आलेत मात्र एकही मृत्यू झाला नाही. लसीकरण केल्यामुळेच पॉझिटिव्ह येऊनही कुणालाही आपला जीव गमवावा लागला नाही. लस ही जीवन रक्षक सिद्ध झाली आहे. ज्या पात्र पोलीस कर्मचारी कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी तात्काळ लस घ्यावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी केले.

ही बाब लक्षात घेता नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे. लसीकरणा नंतर ही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो मात्र लसीचे ‘सुरक्षा कवच’ ज्यांच्याकडे आहेत त्यांना अजिबात धोका होणार नाही हेही तेव्हढेच खरे आहे. लस ही अत्यंत सुरक्षित असून लसीकरणाने आपले जीवन सुरक्षित होणार आहे. जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती केले आहे.

लसीकरण करून घ्या- आ. नाना पटोले
कोरोना विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर लस हेच प्रभावी शस्त्र असून पात्र प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार नाना पटोले यांनी केले. राज्य शासनाने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्यापक जनहिताचा निर्णय असून भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घ्यावी, असे ते म्हणाले. कोरोना विरुद्धचा लढा आपल्याला जिंकायचाच असून त्यासाठी ‘लस घ्या, सुरक्षित रहा’ असा नारा त्यांनी दिला.




Source link

Leave a Reply