गरोदर मातांना लसीकरणाचा धोका नाही


मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवादा’त डॉ. मुखर्जी, डॉ. गुर्जर यांनी साधला संवाद

नागपूर : गरोदर मातांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे पहिल्या १४ ते २६ आठवड्यात त्यांनी कोव्हिड लसीकरण करून घेतले तर त्यांना गंभीर आजार होणार नाही. जन्मणाऱ्या बाळालाही धोका संभवणार नाही, अशी माहिती ‘कोव्हिड संवाद’च्या माध्यमातून स्त्री रोग तज्ज्ञांनी दिली.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता. २६) प्रसूती तथा स्त्री रोग तज्ज्ञ सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. अलका मुखर्जी आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापक तथा स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. भक्ती गुर्जर सहभागी झाल्या होत्या. ‘कोव्हिड आणि स्त्रियांचे आजार’ हा आजच्या कोव्हिड संवादचा विषय होता.

विषयावर प्रकाश टाकताना डॉ. अलका मुखर्जी यांनी कोव्हिड काळात गरोदर मातांना किती धोका आहे, जर गरोदर माता कोरोना पॉझिटिव्ह आली तर त्याचा परिणाम गर्भावर आणि नंतर जन्मणाऱ्या बाळावर पडतो का, गरोदर असताना कोव्हिड प्रतिबंधात्मक लस घेणे योग्य आहे काय आदी प्रश्नांना उत्तरे देत शंकांचे निरसन केले.

गरोदर असताना कोव्हिड पॉझिटिव्ह आले तर कुठला औषधोपचार करायचा, लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर जर पॉझिटिव्ह आले तर दुसरा डोज कधी घ्यायचा, कोव्हिडकाळात गर्भ राहिला तर गर्भपात करायचा का, त्याची गरज आहे का, पॉझिटिव्ह असताना नवजात बाळाला स्तनपान करता येते का, आदी प्रश्नांना डॉ. भक्ती गुर्जर यांनी उत्तरे दिली.

कोरोनाला घाबरण्याची मुळीच गरज नाही. पॉझिटिव्ह आलात तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधी घ्या, कोरोनाचे नियम पाळा, हात साबणाने वारंवार धुवा, बाहेर जाताना मास्क परिधान करा आणि घरात आणि बाहेरही सामाजिक अंतराचे पालन करा, असा सल्लाही डॉक्टरद्वयींनी दिला.




Source link

Leave a Reply