‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचे आवाहन : मनपा-आय.एम.ए.तर्फे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद
नागपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.त्यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमसुध्दा मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनावरील लस हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीबद्दल मनात असलेला गैरसमज दुर सारून ४५ वर्षावारील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे या, असे आवाहन एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि मधुमेह तज्ञ डॉ. शैलेश पितळे व जनरल ॲण्ड लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. जगदीश कोठारी यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. आजचा विषय ‘घाबरू नका लसीकरण करा’ असा होता. या विषयावर संवाद साधतानाच त्यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
विषयासंबंधी बोलतांना डॉ. शैलेश पितळे म्हणाले की, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड अशा दोन प्रकारची लस उपलब्ध आहे. आणि या दोन्ही लस सारखच काम करतात. रुग्णाला लस दिल्यानंतर दोन्ही लसीचा फायदासुद्धा एकसारखाच होतो. त्यामुळे मी कोणती लस घ्यायला पाहिजे असा संभ्रम मनात ठेउ नका, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र लस घेताना दोन्ही डोस एकाच लसीचे घ्यायला हवे असेही त्यांनी सांगितले.
लसीकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले, कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ४ आठवड्यांनी तर कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनी घेतल्यास परिणाम चांगला येतो. पुढे ते म्हणाले, लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणार नाही ही चुकीची धारणा आहे. कोणतीही लस १०० टक्के काम करीत नाही. मात्र भारतीय दोन्ही लस ७० ते ८० टक्के परिणामकारक आहेत. लस घेतलेल्या रुग्ण कोरोना पाझिटीव्ह आल्यास लस शरिरात संसर्ग वाढू देत नाही. त्यामुळे ४५ वर्षावरील प्रत्येकाने लस घेउन स्वत:ला आणि कुटूंबाला सुरक्षित करा असे आवाहन डॉ शैलेश पितळे यांनी केले.
कोव्हिड संवाद कार्यक्रमात उपस्थित डॉ. जगदीश कोठारी म्हणाले की, प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. तसेच या काळात ४५ वर्षावरील कोमार्बिड रुग्णांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित चाचण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार व औषध घ्यावे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करने आवश्यक आहे.आपली इम्युनिटी वाढविण्यासाठी योग्य डायट, जास्तीत जास्त फळे, भरपुर पाणी, पुर्ण झोप आणि ताजे अन्न खाण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला. तसेच कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोरोना त्रिसूत्रीचे (मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर) पालन करण्याचे आवाहन केले.
कोरोना लसीसंदर्भात पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोनावरील लस पुर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने यासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन डॉ. शैलेश पितळे आणि डॉ. जगदीश कोठारी यांनी यावेळी केले.
Source link