ग्रामगीतेचा विचार रुजविणे ही आजच्या काळाची गरज- डॉ.बोरकर


– तिडके महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

रामटेक : श्री. नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेकच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हरिश्चंद्र बोरकर तसेच प्रा. जगदीश गुजरकर हे उपस्थित होते. ” शब्दसृष्टीचे ईश्वर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी सांगितले की राष्ट्रसंतांची शब्दश्रीमंती ही त्यांच्या ग्रामगीतेतून पदोपदी दिसून येते.

ग्रामगीतेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कितीतरी नवे शब्द मराठी भाषेला दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचा विचार जर यापूर्वीच खेडोपाडी रुजला असता तर आज राष्ट्राची अधोगती झाली नसती असे त्यांनी सांगितले. “समाजक्रांती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” या विषयावर बोलताना प्रा.जगदीश गुजरकर यांनी भक्ती आणि अध्यात्माच्या बळावर आदर्श नागरिक तयार करण्याचे कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या जीवनातून प्रत्यक्षात करून दाखविले.राष्ट्रभावना, मानवता,बंधुभाव हे सर्व समाजाला शिकवून गावातूनच देशाचा विकास कसा होईल हे राष्ट्रसंतांनी सांगितले.

आज राष्ट्रसंताच्या विचाराचा हा वारसा पुढे चालवण्याची गरज आहे असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे यांनी राष्ट्रसंतांच्या चिंतनाचा बिंदू हा सामान्य माणूस होता. सामान्य माणसाच्या विकासातून गावाचा, समाजाचा व देशाचा विकास होऊ शकतो. सामान्य माणूस जोपर्यंत सुखी होणार नाही तोपर्यंत देश सुखी आणि समृद्ध होणार नाही असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. नितीन घमंडी यांनी मानले. तांत्रिक सहकार्य डॉ. श्रीकांत भोवते यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुनील कठाणे, डॉ. मनोज तेलरांधे, डॉ.बाळासाहेब लाड, प्रा.स्वप्निल मनघे,अमरीश ठाकरे, प्रा. गजानन रेवतकर प्रा.सरीता सिंग,प्रा.कल्पना पटेल यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापक गणमान्य व्यक्ती व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन हजेरी लावली होती.
Source link

Leave a Reply