ग्रामीण क्षेत्र समृध्द करणे हा आत्मनिर्भरतेचा मार्ग : ना. गडकरी


फॉर्च्युन फाऊंडेशन व्याख्यानमाला


नागपूर: देशाच्या कृषी, ग्रामीण, आदिवासी आणि मागास क्षेत्राचा विकास करून हे क्षेत्र समृध्द करणे हा आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग आहे. कृषी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण केल्यास त्याचा विकासामध्ये वाटा वाढेल आणि खर्‍या अर्थाने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘फॉर्च्युन फाऊंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समीट’ व्याख्यानमालेत आत्मनिर्भर भारत विषयावर गडकरी बोलत होते. यावेळी फॉर्च्युन फाऊंडेशनचे प्रमुख प्रा. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- समाजाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण,कृषी आणि मागास भागाचा विकास हा महत्त्वाचा आहे. जोपर्यंत ग्रामीण भागातील माणसाचे जीवन बदलणार नाही, तोपर्यंत देश बदलणार नाही. आत्मनिर्भर भारत या संकल्पेत देशाची व्यवस्था जगात पहिल्या क्रमांकाची म्हणून उभी करणे अपेक्षित आहे. यासाठी विविध क्षेत्राचा विकास वाढवावा लागेल.

एमएसएमईमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि व्यवसायाची संधी आहेत, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- देशाच्या जीडीपीमध्ये 30 टक्के वाटा एमएसएमईचा आहे. तो आता 40 टक्क्यांपर्यंत नेण्याचे शासनाचे ध्येय आहे. यामुळे नागपूर, विदर्भ, आणि देश आत्मनिर्भर होणार आहे. देशातील गरिबी दूर करणे हेही आत्मनिर्भर भारताकडे जाणारे एक पाऊल असून त्यासाठी रोजगार निर्मिती आवश्यक आहे. एमएसएमईच्या माध्यमातून आतापर्यंत 11 कोटी रोजगार निर्मिती झाली असून येत्या पाच वर्षात आणखी 5 कोटी रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य शासनाचे आहे, असेही ते म्हणाले.

तसेच ग्रामीण, कृषी आणि आदिवासी भागात भांडवली गुंतवणूक केली तर मागास असलेली गावे आपण संपन्न करू शकतो, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- रोजगारासाठी ग्रामीण भागातून 30 टक्के लोक शहराकडे गेले. हे स्थलांतर थांबविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आत्मनिर्भर भारतासाठी हे आवश्यक आहे. गायीच्या शेणापासून पेंट निर्मितीवर उद्योगावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. भविष्यात सर्व शहरांना मेट्रोने जोडण्याचे काम सुरु होत आहे. यातूनही मोठ्या प्रमणावर रोजगार निर्मिती होईल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले.
Source link

Leave a Reply