डॉ. पंजाबराव देशमुख शेतकर्‍यांच्या प्रगतीचा ध्यास घेणारे युगपुरुष : ना. गडकरी


‘स्पंदने’ विशेषांकाचे प्रकाशन

नागपूर: डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आयुष्यभर सामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास घेऊन शेती प्रदर्शनांच्या माध्यमातून देशातला शेतकरी ज्ञानी व विकसित करण्याचा प्रयत्न केला. पंजाबराव हे शेतकर्‍यांच्या प्रगतीचा ध्यास घेणारे युगपुरुष आहेत, असे विचार केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी डिसेंबर 1959 ते फेब्रुवारी 1960 या काळात नवी दिल्ली येथे शंभर एकर जागेवर जागतिक कृषी प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर व समारोपाला रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव उपस्थित होते. या प्रदर्शनाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘स्पंदने’ हा जागतिक कृषी प्रदर्शनाची दखल घेणारा 432 पानांचा ग्रंथ तयार करण्यात आला असून त्या ग्रंथाचे प्रकाशन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांनी या ग्रंथाचे लेखन व संपादन केले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संचालक अ‍ॅड. गजानन फुंडकर, लेखक सुधीर भोंगळे, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरेंद्र जिचकार आणि नागपूर सायन्स कॉलेजे प्राचार्य डॉ.महेंद्र ढोरे उपस्थित होते.

ना. गडकरी याप्रसंगी म्हणाले की, शेती आणि शिक्षण या दोन विषयांचा आयुष्यभर ध्यास घेऊन जगातले उत्तमातले उत्तम ज्ञान व तंत्रज्ञान भारतात आणून ते शेतकर्‍यांना देण्याचा प्रयत्न डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी केला. त्यांच्या दूरदृष्टी व प्रयत्नांमुळेच त्यावेळी पीएल 480 चा करार होऊन अमेरिकेकडून भारताला दुष्काळ आणि संकटसमयी अन्नधान्याचा पुरवठा होऊ शकला. शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणून त्यांनी शेतीमालाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न केला. एव्हढेच नव्हे तर भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतात पहिली हरितक्रांती यशस्वी होऊ शकली. म्हणून ते हरितक्रांतीचे उद्गातेही आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.

डॉ. भोंगळे यांनी देशभर हिंडून या ग्रंथासाठी जी माहिती व फोटो गोळा केले आहेत, त्यामुळे आता पहिल्या जागतिक शेती प्रदर्शनाची माहिती राज्यातील सर्व शेतकर्‍यांना होईल. शिवाजी शिक्षण संस्थेनेही आता अशी प्रदर्शने आयोजित करून हा ग्रंथ इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातूनही जनतेला उपलब्ध करून द्यावा, असेही ना. गडकरी म्हणाले.




Source link

Leave a Reply