दिव्यांग खेळाडूंचे यश नागपूरसाठी अभिमानास्पद : महापौर - Expert News

दिव्यांग खेळाडूंचे यश नागपूरसाठी अभिमानास्पद : महापौर


राष्ट्रीय पॅरॉलिफ्टींग स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदक मिळविणाऱ्या खेळाडूंचा केला सत्कार

नागपूर : दिव्यांग खेळाडू प्रतिमा कृष्णराव बोंडे आणि रोशनी प्रकाश रिंके यांनी राष्ट्रीय पॅरालिफ्टींग स्पर्धेत निरनिराळ्या गटात अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावून नागपूरची मान उंच केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या दोन्ही दिव्यांग खेळाडूंचे यश हे नागपूरसाठी अभिमानस्पद असल्याचे गौरवोद्‌गार महापौर दयाशंकर तिवारी यांनी काढले. तदनंतर मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनीसुध्दा दोन्ही मुलींचा सत्कार आपल्या कक्षात केला.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिमा बोंडे आणि रोशनी रिंके यांचा सोमवारी (ता. २२) महापौर कक्षात महापौर दयाशंकर तिवारी आणि उपमहापौर मनीषा धावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सत्कारप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे यांच्यासह सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने, नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त राजेश भगत, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर उपस्थित होते.

प्रतिमा बोंडे आणि रोशनी रिंके ह्या दोघीही एकलव्य राज्य पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत. या दोघीही नुकत्याच बेंगलुरु येथे २० व २१ मार्च रोजी पार पडलेल्या पॅरावेटलिफ्टींग स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिव्यांगांसाठी विविध योजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहायता करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी १५ हजार रुपयांची सहायता करण्यात आली होती. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे सहकार्य करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात एकमेव ठरली आहे.

या दोन्ही खेळाडूंपैकी प्रतिमा बोंडे हिने ५० किलो वजन गटात सुवर्णपदक तर रोशनी रिंके हिने ५५ किलो वजन गटात कांस्य पदक प्राप्त करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्थान प्राप्त केले. या दोघींचाही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सत्कार करीत त्यांचे भरभरून कौतुक केले. दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शक्य ते सहकार्य केले जाईल, असा विश्वास दिला. अन्य उपस्थितांनीही यावेळी पदकप्राप्त खेळाडूंचे कौतुक केले. प्रतिमा बोंडे आता थायलैंड मध्ये होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करत आहे. यासाठी सुध्दा मनपा यांना आर्थिक सहाय्यक करेल, असे महापौरांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

%d bloggers like this: