ना. गडकरींच्या नेतृत्वात रस्ते बांधकामात महामार्ग मंत्रालयाचा जागतिक विक्रम


एका दिवसात 37 किमी बांधकामाची गती
7 वर्षात महामार्गांच्या लांबीत 50 टक्के वाढ

नागपूर: रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात महामार्ग बांधकामात जागतिक विक्रम केला आहे. मार्च 2021 च्या अखेरपर्यंत महामार्ग मंत्रालयाने एका दिवसात 37 किमी या गतीने महामार्ग बांधकाम केले आहे. जगात सर्वाधिक गतीने महामार्गाचे बांधकाम करणारा देश म्हणून भारताकडे पाहले जात आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षात देशभरात राष्ट्रीय महामार्गांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. गेल्या 7 वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी 50 टक्क्याने वाढली आहे. 2014 मध्ये 91,287 किमी वरून 1 लाख 37 हजार 625 किमीपर्यंत महामार्गांची लांबी गेली आहे. आर्थिक वर्ष 2015 मध्ये 33 हजार 414 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीतही वाढ होऊन ती आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1 लाख 83 हजार 101 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

कोविडच्या काळातही बांधकामाचा दर वाढताच होता. या काळातही मंजूर रक्कम 126 टक्के वाढली असून 2020 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021 मध्ये किलोमीटरच्या मंजूर लांबीमध्येही 9 टक्के वाढ झाली आहे. सन 2010 ते 2014 च्या तुलनेत सन 2015 ते 2021 या कलावधीत वार्षिक प्रकल्पात 85 टक्के वाढ झाली आहे, तर वार्षिक बांधकामात 83 टक्के वाढ झाली आहे. सन 2020 (मार्चपर्यंत) च्या तुलनेत सन 2021च्या अखेरीस सुरु असलेल्या प्रकल्पांच्या कामकाजाच्या किमतीत 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महामार्ग मंत्रालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांमुळे ही यशस्वी कथा रचली गेली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सन 2014 नंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण त्यावर उपाययोजना करून या विभागातील अधिकार्‍यांनी हे काम केले. आमची क्षमता खूप आहे. फक्त लक्ष्य मोठे हवे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- बांधकामाचा दर्जा उत्तम आणि खर्चात बचत कशी होईल, हेच आम्ही केले. लवकरच एका दिवसाला 40 किमी या गतीच्या पुढे आम्ही जाऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Source link

Leave a Reply