ना. गडकरींच्या प्रयत्नांतून कोरोना रुग्णांसाठी मिळणार ऑक्सीजन


-पुरवठा करणार्‍या टँकर्सची संख्या वाढवा : निर्देश
-चार कंपन्यांशी स्वत: केला संपर्क
-मनपात कोरोना उपाययोजना आढावा बैठक

नागपूर: नागपूर शहर जिल्हा आणि भंडारा, वर्धा जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांना त्वरित ऑक्सीजन उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सीजनची निर्मिती करणार्‍या चार मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधून कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजनची व्यवस्था केली. हा ऑक्सीजन सिलेंडर, टँकरच्या माध्यमातून त्वरित पुरवला जावा यासाठीची व्यवस्था जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी करावी असे निर्देश दिले.

ना.गडकरी यांनी आज महापालिकेच्या कोरोना वॉर रुममध्ये महापौर, मनपाआयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, ड्रग डीलर्स असोसिएशन व तसेच सामाजिक आणि वैद्यकीय संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह कोरोना रुग्णांसाठी उपाययोजना म्हणून आढावा बैठक घेतली. या बैठकीला आ. समीर मेघे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, आ. प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, संजय भेंडे, शैलेश जोगळेकर, चंदू पेंडके आदी उपस्थित होते.

येत्या आठ दिवसात महापालिकेने आपल्या हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त बेड वाढविण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. नागपूरच्या सीमेजवळ कॅन्सर रुग्णालयात 100 बेड तातडीने आणि 100 बेड आठ दिवसात उपलब्ध करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी शैलेश जोगळेकर यांना दिल्यात. तसेच रुग्णांना तातडीने सेवा मिळावी म्हणून अतिरिक्त बेड्ससाठी आवेदन करणार्‍या रुग्णालयांना 24 तासात परवानगी देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

शहरात कोविड रुग्णांना ऑक्सीजन उपलब्ध नाही म्हणून अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र अत्यंत गंभीर असल्याचे ना. गडकरी म्हणाले. शहराला दररोज दिवस 15 मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा आवश्यक आहे. ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी ना. गडकरी यांनी यावेळी वर्धा जिल्ह्यातील लॉयड स्टील, उत्तम गल्व्हा या कंपन्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधून ऑक्सीजन मिळवला. तसेच भिलाई येथील प्रॅक्स एअर आणि भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग या कंपन्याही नागपूरला ऑक्सीजन पुरवठा करण्यास तयार आहेत. ऑक्सीजन शहरात आणण्याची आणि वैद्यकीय मापदंडानुसार तपासून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर देण्यात आली आहे. उत्तम गल्व्हा या कंपनीचे 350 मे.ट. ऑक्सीजन दररोज निर्मितीची क्षमता असून ही कंपनी ऑक्सीजनचा पुरवठा करण्यास तयार आहे. ऑक्सीजनची कोणतीही कमी पडू देणार नाही, असेही ना. गडकरी यांनी सांगितले.

आतापर्यंत ना.गडकरी यांच्या प्रयत्नांतून शहराला 7150 रेमडिसीवीर इंजेक्शन मिळाले आहेत. पण ज्या रुग्णांना अत्यंत आवश्यक आहे त्यांना हे औषध द्या. सात हजार इंजेक्शन आणखी येणार असून ते इंजेक्शन आवश्यक रुग्णांना प्राधान्याने मिळतील यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी वितरणाची योग्य व्यवस्था करावी. कोणतीही अधिक किमत न स्वीकारता हे इंजेक्शन रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही प्रशासनाला ना. गडकरी यांनी दिले.

रेमडेसीवर उत्पादनाचे पेटेंट 4 कंपन्यांकडे आहे. या चार कंपन्या युध्दस्तरावर औषध निर्मिती करीत आहेत. पण आवश्यक तेवढा पुरवठा त्या करू शकत नाही. यासाठी पेटेंटचा कायद्यातील कलम 84 काही काळासाठी शिथिल करण्यासाठ़ी ना.गडकरी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे. हा कायदा शिथिल झाला तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे औषध तयार करणार्‍या काही कंपन्यांना हे औषध बनविण्याची परवानगी देता येईल, यासाठ़ी ना. गडकरी यांनी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया यांच्याशी संपर्क केला.
Source link

Leave a Reply