पश्चिम बंगालमधील निवडणूकपश्चात बलात्कार व हत्यासत्रांवर कथित पुरोगामी गप्प का?


भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा सवाल : संविधान चौकात दिले धरणे

नागपूर : पश्चिम बंगालध्ये निवडणूक निकाल पश्चात सुरू असलेले भाजप कार्यकर्त्यांचे हत्यासत्र आणि महिलांवर अन्याय अत्याचाराविरोधात तथाकथित पुरोगामी गप्प का? असा सवाल प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला. ते संविधान चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते.

यावेळी अनु. जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, माजी आमदार डॉ. मिलींद माने, संदीप जाधव, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, राजेश संगेवार आदी उपस्थित होते.

पश्चिम बंगालमधील अन्याय अत्याचाराविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात आंदोलन करण्यात आले. नागपूर शहरामध्ये संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली बसून भाजपाचे पदाधिकारी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेत, कार्यकर्ते व सरकारप्रणीत गुंडांचा निषेध नोंदविला. यावेळी हातात फलक घेउन पदाधिका-यांनी घोषणाही दिल्या.

यावेळी भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सरकार प्रायोजित गुंडांच्या मदतीने हिंसाचार चालविलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांच्या हत्या, महिला कार्यकर्त्यांवर बलात्काराचे सत्र सुरू आहे. बंगालमध्ये आज भाजपाच्या २४ कार्यकर्त्यांची हत्या झालेली आहे. अनेक जण दहशतीमध्ये जगत आहेत. यासाठी जबाबदार सर्व तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे, पदाधिका-यांचे आणि सरकार प्रायोजित गुंडांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बंगालमध्ये ज्या महिलांवर अत्याचार सुरू आहे, ज्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनीशी संपूर्ण देश उभा आहे. एवढेच नव्हे तर भविष्यामध्ये आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून संपूर्ण ताकदीने प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्व गुंडांनी तातडीने हे लोकशाहीचे सुरू असलेले हत्यासत्र थांबवावे, असा इशारा देत ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम पुरोगामी सो कॉल्ड नेत्यांनी याप्रसंगी बंगालमध्ये सुरू असलेल्या या लोकशाहीच्या हत्येविरोधात त्यांनी आपला आवाज बुलंद करावा अथवा किमान मौन तरी सोडावे, असे आवाहन केले आहे.
Source link

Leave a Reply