मनपाचे डॉक्टर्स देणार मेयोमध्ये सेवा


महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली मेयोमधील व्यवस्थेची पाहणी

नागपूर: कोव्हिड रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णालयातील खाटा ‘फुल्ल’ झाल्या आहेत. डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे उपचारात अडसर निर्माण होतोय, या सर्व बाबींचा आणि व्यवस्थेचा आढावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज मेयोच्या दौऱ्यादरम्यान घेतला. डॉक्टरांची कमतरता बघता मनपाच्या सेवेतील काही डॉक्टर्स मेयो मध्ये सेवा देतील. त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी (ता. २६) इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. सागर पांडे, सामाजिक कार्यकर्ता बबलू कुकरेजा उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मेयोमध्ये असलेली व्यवस्था, खाटांची स्थिती, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची स्थिती, ऑक्सिजनची उपलब्धता आदींचा आढावा घेतला. मेयोमध्ये उपलब्ध ६०० बेडसपैकी ४८० बेडस कोव्हिड रुग्णांसाठी राखीव आहेत. १५ बेडस किडनीचे आजार असलेल्या आणि कोव्हिड झालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. कोव्हिड झालेल्या गरोदर स्त्रियांसाठी १५ बेडस राखीव आहेत. एक ४० खाटांचा वॉर्ड कोव्हिडमधून बरे झालेले मात्र काही आजार झालेल्या रुग्णांसाठी राखीव आहे.

तर संशयित रुग्णांसाठी सारीचे दोन वॉर्ड आहेत. मेयोमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या सुमारे ७० डॉक्टरांची परीक्षा असल्याने त्यांच्या जागी नव्या डॉक्टरांची आवश्यकता आहे. मेयोने प्रशासनाकडे ७५ डॉक्टरांची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी २५ डॉक्टर्स देण्याचे आश्वासन दिले. त्यापैकी १५ डॉक्टर्स पाठविले, त्यापैकी ७ डॉक्टर्स रुजू झाले. मनपाने ९ डॉक्टर्स पाठविले. ते रुजू झालेत. जे अतिरिक्त डॉक्टर्स लागतील, त्याची पूर्तता मनपाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. मेयो प्रशासनाने तसे पत्र मनपाला दिले आहे. यासंदर्भात मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्याशी चर्चा झाली असून उद्या १५ डॉक्टर्स रुजू होतील असे त्यांनी सांगितल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.


आय.ए.एस. अधिकारी करणार व्यवस्थापन
मेडिकल आणि मेयो रुग्णालयांचे संचालन व्यवस्थितपणे करण्यासाठी दोन्ही रुग्णालयांची जबाबदारी आय.ए.एस. अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. रुग्णालयातील अधिकारी आरोग्य सेवेचे व्यवस्थापन बघतील तर प्रशासनाने जबाबदारी दिलेले अधिकारी मनुष्यबळाचे व्यवस्थापन बघतील, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
Source link

Leave a Reply