नागपूर: लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करून दिल्यानंतर सद्यस्थितीत महावितरणचे 65 लाख वीजग्राहक दरमहा सरासरी 1416 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करीत आहेत. महावितरणची वेबसाईट व मोबाईल अॅप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे.
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून 2016 पासून मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.
‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल अॅपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत कोकण प्रादेशिक विभागात 30 लाख 54 हजार वीजग्राहक दरमहा सरासरी 695 कोटी रुपयांचा तर पुणे प्रादेशिक विभाग – 18 लाख 71 हजार ग्राहक 425 कोटी 80 लाख रुपयांचा, नागपूर प्रादेशिक विभागात 10 लाख 88 हजार ग्राहक 189 कोटी 64 लाख रुपयांचा आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात 4 लाख 94 हजार वीजग्राहक 105 कोटी 41 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीजग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी घेत रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ‘ऑनलाईन’ सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.






















Source link