रेमडेसेवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा : आ.कृष्णा खोपडे


कोविड रुग्णालयास व तेथील फार्मसीमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी

नागपूर : नागपूर शहरात कोरोनाचे थैमान सुरु असताना रुग्णास आवश्यक असलेले रेमडेसेवीर या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत असून 1500 ते 2500 पर्यंत मिळणारे इंजेक्शन 8 ते 10 हजार मध्ये विक्री होत आहे. औषधांचे अनेक दलाल यात सक्रीय असून मोठा काळाबाजार नागपूर शहरात होत आहे.

इंजेक्शनचा वाढता तुटवडा व रुग्णालयात बेडची अनुपलब्धता कदाचित यामुळेसुद्धा मृत्यूचा आकडा शहरात वाढत आहे. वेळीच यावर नियंत्रण केले नाही तर परिस्थिती अधिकच भयानक होऊ शकते. अशी चिंता आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.

आमदार कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचेशी चर्चा केली असून हा काळाबाजार तातडीने थांबविण्यासाठी कठोर पाउले उचलावीत अशी मागणी केली. तसेच ज्या रुग्णालयास प्रशासनाने कोविड रुग्णालय म्हणून परवानगी दिलेली आहे. त्या रुग्णालयास थेट या औषधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. किंवा त्या रुग्णालयात असलेल्या फार्मसी मध्ये तरी उपलब्ध करून दयावा, जेणेकरून रुग्णांना वेळीच औषधोपचार उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचविण्यास मदत मिळेल.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रेमडेसेवीर साठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, नेमकी ही परिस्थिती नागपूर शहरात होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाने स्वत: गंभीर लक्ष देऊन रेमडेसेवीर या इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा.
Source link

Leave a Reply