लहान मुलांमधील लक्षणांनाही गांभीर्याने घ्या - Expert News

लहान मुलांमधील लक्षणांनाही गांभीर्याने घ्या


‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

नागपूर : ज्येष्ठ, तरूण यांच्याप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोनाचा धोका आहे. मागील तीन महिन्यामध्ये १८ वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचीही नोंद झालेली आहे. त्यामुळे लहान मुलांना कोरोनाचा धोका नाही, हा भ्रम ठेवू नका. लहान मुलांमध्ये दिसणा-या लक्षणांना गांभीर्याने घ्या. लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त नसला तरी त्यांच्यामुळे इतरांना होणारा धोका मोठा आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्या. सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचे स्वत: पालन करा व मुलांनाही त्याचे अनुकरण करायला लावा, असा सल्ला प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा महाराष्ट्र मेडिकल कौंसिलचे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी व न्यूरॉन हॉस्पिटलच्या संचालक डॉ. मंजूषा गिरी यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.२६) डॉ. विंकी रुघवानी व डॉ. मंजूषा गिरी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले. लहान मुलांना कोरोना होतो का, त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे का, त्यांना कोरोनाचा धोका आहे का, अशी विविध प्रश्न यावेळी दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांना विचारण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगतिले की, सध्या कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल दिसून येत आहे. खोकला, सर्दी, ताप या लक्षणांसोबतच पोटदुखी, हगवण, उलट्या, थकवा, कमजोरी ही सर्व लक्षणे कोरोनाबाधितांमध्ये दिसून येतात. त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांचीही पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त नसला तरी ते सर्वात मोठे वाहक ठरू शकतात. त्यामुळे बाहेर खेळायला जाताना मुलांना अवश्य मास्क लावायला सांगा. त्यांना कुठलीही लक्षणे आढळल्यास त्याला सहज घेउ नका. त्यामुळे घरातील ज्येष्ठांना धोका होउ शकतो. त्यामुळे नियमांचे पालन करा, असे आवाहनही डॉ. विंकी रुघवानी व डॉ. मंजूषा गिरी यांनी केले.

कोव्हिड लसीकरणामुळे कोरोना होत नाही, हा समज चुकीचा आहे. लसीकरणानंतरही कोरोना होउ शकतो मात्र त्याची तीव्रता जास्त राहणार नाही. कोरोना झाल्यास तो सौम्य स्वरूपातच असेल, त्यामुळे लसीकरण सुरक्षित आहे ही जनजागृती सर्व स्तरावर होणे आवश्यक आहे. लसीकरणाविषयी सोशल मीडियावर फिरणा-या चुकीच्या संदेशांकडे दुर्लक्ष करा, असे संदेश पसरविण्यास सहकार्य करू नका, ज्यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे, अशा सर्वांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. मंजूषा गिरी यांनी केले.

गंभीर आजार असलेल्यांनी लस घेताना त्यांच्या जुन्या आजाराची औषधे बंद करावी का, या प्रश्नावर बोलताना डॉ. विंकी रूघवानी म्हणाले, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा रुग्णांना नियमीत त्यांची औषधे घेणे आवश्यक आहे. त्या औषधांचा लसीकरणावर परिणाम पडू शकत नाही. मात्र तरी सुद्धा लसीकरणापूर्वी आपल्या नियमीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय ज्यांना औषधांची, लसीची ॲलर्जी होते त्यांनीही त्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणे असल्यास लस घेउ नये. त्यापूर्वी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास लस घ्यावी व पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोन आठवड्याच्या कालावधीनंतर लस घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.
Source link

Leave a Reply

%d bloggers like this: