लॉकडाऊन काळात मेट्रोचे १० मेट्रो स्थानक तया


प्रतिकूल परिस्थितीतही प्रवाश्यांच्या सुविधेसाठी मेट्रो सेवा सुरु

नागपूर : कोविडचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार आणि पर्यायाने टाळेबंदी झाल्याने याचा सर्वत्र फटका बसला असला तरीही दुसरीकडे मात्र याच काळाचा योग्य फायदा करून घेत, या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महा मेट्रोने आपल्या कामाची गती कायम ठेवत मोठी मजल मारली आहे. या काळात महा मेट्रोने एकूण १० मेट्रो स्थानकांचे काम पूर्ण करत तेथून प्रवासी वाहतूक सेवा सुरु केली आहे. यामुळे आता कार्यरत असलेल्या एक्वा आणि ऑरेंज मार्गीकेवरील सर्वच मेट्रो स्थानके प्रवाश्यांकरता सुरु झाली आहेत.

महा मेट्रोची प्रवासी सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असली तरीही महा मेट्रो प्रशासनाने निर्माण कार्याची गती कायम ठेवत ऑरेंज आणि अँक्वा लाईन मार्गिकवरील गेल्या आठवड्यात एकूण ०४ मेट्रो स्टेशन प्रवासी सेवे करिता सज्ज केलेत. लॉकडाऊन सारख्या कठीण काळात बांधकाम होऊन तयार झालेल्या आणि आता प्रवाश्यांच्या सेवेत रुजू झालेल्या या स्थानकांमध्ये ऑरेंज मार्गिकेवरील काँग्रेस नगर, छत्रपती चौक आणि उज्वल नगर तसेच अँक्वा लाईनवरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वीच ऑरेंज मार्गिकेवरील रहाटे कॉलोनी आणि अजनी चौक, तर अँक्वा लाईनवरील बंसी नगर आणि एलएडी चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.. आणि त्याहीपूर्वी शंकर नगर आणि रचना रिंगरोड अश्या १० मेट्रो स्थानकांची कोरोना पँडेमिक काळात लॉकडाऊन असतांना आणि कामगार उपलब्ध नसतांनाही कामाची गती कायम ठेवत बांधकाम पूर्ण केले शिवाय ते प्रवाश्यांसाठी सुरूही करण्यात आले आहे.

प्रथम लोकडाऊनच्या वेळेस कामगारांनी त्यांच्या मूळ गावी जायचे ठरवल होते, कोणाचीही अडवणूक न करता ज्यांना जाता येईल त्यांची जाण्याची सोय करून देण्यात आली होती. ज्या कामगारांनी इथेच राहायचे ठरवले त्यांच्या राहण्यापासून ते जेवणाची आणि आरोग्य तपासणीची देखील योग्य सोय करून देण्यात आली होती. अनलॉक-१ नंतर सगळे कामगार परत येऊ शकले नाही तरी देखील महा मेट्रोने न थांबता आहे तेवढ्या कामगार आणि मशीनच्या साहाय्याने कार्यास सुरुवात केली. न थांबता, न थकता योग्य ती सगळी काळजी घेत कार्य नियमित पणे करण्यात आले आणि काहीच महिन्यात त्याचा परिणाम देखील पाहण्यात आला. वर्षभर सुरु असलेल्या अडचणींना तोंड देत दोन्ही मार्गिकेवरील सर्व मेट्रो स्थानक पूर्ण करत, अल्पकाळात मेट्रो सेवा सुरु करण्यात आली.

या सर्व मेट्रो स्थानकांवर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंटमध्ये अग्निशामक टॅंक, दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा,अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था,कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरता तरतूद, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, लहान मुलांच्या देखरेखीकरता स्वतंत्र खोली (बेबी केयर रूम), कॉन्कोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण स्टेशन सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत असणार आहे.

याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येते. या शिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर साफ-सफाई करण्यात येते. मेट्रोच्या कार डेपोमध्ये स्वयंचलित ट्रेन वॉश प्लांट सिस्टम स्थापित केली गेली आहे आणि प्रवासी सेवेच्या आधी आणि नंतर दररोज ट्रेन स्वच्छ करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. हा प्लांट ट्रेनच्या दोन्ही बाजू तसेच अंतर्गत बोगी धुण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मेट्रो ट्रेन पीएलसी – प्रोग्राम केलेले नियंत्रण पॅनेलद्वारे आपोआप धुतली जाते. कोणत्याही लांबीची ट्रेन कार्यक्षमतेने धुण्यास हे उपकरणे सक्षम आहेत. हे आधुनिक वॉश प्लांट फोटो इलेक्ट्रिक सेन्सरने सुसज्ज आहे जे पाणी आणि उर्जा वापर दोन्हीची बचत करण्यास मदत करते. हे मशीन अवघ्या ३ मिनिटांत पूर्ण ट्रेन सेट धुऊ शकते. वॉश प्लांट स्वयंचलित आहे. याव्यतिरिक्त, बोगीची योग्य देखभाल करण्यासाठी इनबिल्ट मॅन्युअल मोडचा वापर देखील केला जाऊ शकतो. या वॉश प्लांटची स्वतःची रीसायकलिंग व्यवस्था आहे आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार १००% पाणी पुनर्वापर करता येते. हा प्लांट आपत्कालीन स्टॉप आणि वेग नियंत्रण यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्प नागपूर शहरासाठी एक बहुआयामी प्रकल्प ठरतो आहे. सध्या कोरोना काळ लक्षात घेता खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून ऑरेंज लाईन मार्गिकेवर सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजता पर्यंत दर ३० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु आहे व ऍक्वा लाईन मार्गिकेवर सिताबर्डी इंटरचेन्ज ते लोकमान्य नगरमेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजता पर्यत दर ३० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु आहे. शनिवार आणि रविवारी मात्र दर एक तासांनी या फेऱ्या होतील.
Source link

Leave a Reply