लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी संदीप कदम - Expert News

लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी संदीप कदम


191 केंद्रावर लसीकरण सुविधा
1 एप्रिलपासून 45 वर्षा वरील सर्वांना लस

भंडारा:- जिल्ह्यात एक मार्चपासून नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व काही खाजगी रुग्णालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. स्थानिक संस्थेचे लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, व सामाजिक कार्यकर्त्यांनी लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. आज त्यांनी कोविड आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना लसीकरणास जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून सुरूवात झाली असून आतापर्यंत 1 लाख 6 हजार 966 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. 1 मार्च पासून जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणास जिल्ह्यात सुरूवात झाली असून 45 ते 60 वर्ष वयोगटातील 20 हजार 977 तर 60 वर्षावरील 61 हजार 974 असे एकूण 82 हजार 951 जेष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.

लसीकरण मोहिम वेगाने सुरू असून शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात आले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रमाणात लस घ्यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता आपल्या क्षेत्रातील पात्र नागरिकांचे पूर्ण लसीकरण व्हावे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोविड 19 ची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरण केंद्रावर याबाबतची माहिती लाभार्थ्यांना देण्यात येते. लस घेतल्यानंतर थोडा ताप किंवा अंगदुःखी सारखे वाटण्याची शक्यता आहे. अशावेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा सल्ला शासकीय रुग्णालयात अगदी मोफत देण्याची सोय उपलध्द आहे.

1 एप्रिलपासून 45 वर्षा वरील सर्वांना लस

केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनेनुसार 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्व नागरिक कोविड लस घेण्यास पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सध्या आयसीयू मध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी कोणीही लस घेतली नव्हती म्हणून त्यांचा धोका वाढून आयसीयू मध्ये दाखल करावे लागले. कोरोनावर मात करण्यासाठी लस हाच उत्तम उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link

Leave a Reply

%d bloggers like this: