विद्यापीठ कॅम्पस परिसर ते आरटीओ उड्डाणपूलही मंजूर


– महाराष्ट्रातील 2800 कोटींच्या महामार्गांना गडकरींची मंजुरी

नागपूर– राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील 2800 कोटींच्या महामार्गांना मंजुरी दिली. यात नागपूरचा विद्यापीठ कॅम्पस परिसर ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या उड्डाणपुलालाचाही समावेश करण्यात आला आहे. 478.83 कोटी खर्च करून हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. नुकतीच या कामांबाबतची घोषणा ना. गडकरी यांनी केली होती. जनतेला दिलेला शब्द या कामांना मंजुरी देऊन ना. गडकरी यांनी पाळला.

आरटीओ ते विद्यापीठ कॅम्पस परिसर हा वाडी आणि एमआयडीसी जाणार्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा उड्डाणपूल 4 पदरी राहणार असून काही महिन्यांपूर्वीच या पुलासंदर्भातील घोषणा ना. गडकरी यांनी केली होती. नागपूरकरांना दिलेला शब्द ना.गडकरी यांनी खरा करून दाखविला आहे. याशिवाय तिरोडा गोंदिया हा 28 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील महामार्गालाही मंत्रालयाने मंजुरी दिली. 288.13 कोटींचा हा महामार्ग असेल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ वर मराठवाड्यातील परळी ते गंगाखेड या मार्गाचे उच्च गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून 244.44 कोटी ़रुपये यासाठी खर्च येईल. आमगाव गोंदिया भागातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 वरील महामार्गही मंजूर करण्यात आला. 239. 24 कोटी रुपये खर्च या महामार्गाला येणार आहे. नांदेड जवळील येसगी गावाजवळ मंजिरा नदीवरील पुलाच्या कामालाही अंदाजपत्रकात मंजुरी देण्यात आली आहे. 188 कोटींचे हे काम आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तारेरे गगनबावडा ते कोल्हापूर या महामार्गाचाही महामार्ग मंत्रालयाने मंजूर कामात समावेश केला असून राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरील या महामार्गासाठी 167 कोटी खर्च येईल. पूर्व विदर्भातील तिरोडा गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753वरील दुपदरी रस्ताही मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय वरील वाटूर चारठाणा या रस्त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या कामालाही मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. 228 कोटी रुपयांचे हे काम आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.353 सी 262 व्या किमीपासून 321 व्या किमीपर्यंतच्या बांधकामाला आणि 16 लहान व मोठ्या पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून या कामासाठी 282 कोटी खर्च होतील.

कोकणातील गुहार चिपळूण या 171 कोटींच्या महामार्गाच्या कामाला तसेच खानदेशातील जळगाव चाळीसगाव-नांदगाव-मनमाड या महामार्गात सुधारणा करण्याच्या कामाला अंदाजपत्रकात मंजुरी देण्यात आली आहे. 252 कोटी रुपये या कामासाठी खर्च करण्यात येतील.
Source link

Leave a Reply