शून्य अपघात मोहीम राबविणार : ना. गडकरी लोकसभा-प्रश्नोत्तरे - Expert News

शून्य अपघात मोहीम राबविणार : ना. गडकरी लोकसभा-प्रश्नोत्तरे


नागपूर/दिल्ली: रस्ते बांधकामाचा वेग कमी झाला तरी चालेल पण शून्य अपघात मोहीम राबवून लोकांचा जीव वाचविण्यासाठी आमच्या विभागाचे प्राधान्य राहील, अशी ग्वाही केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात दिली.

खा. श्रीनिवास पाटील यांनी सातारा पुणे या राष्ट्रीय महामार्गाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी या राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघातांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावर ना. गडकरी यांनी उत्तर दिले की, येत्या 2-3 महिन्यात या महामार्गावरील समस्या संपणार आहे. अपघाताला निमंत्रण देणारे रस्ते यापुढे बनणार नाही. रस्ते बनले नाही किंवा महामार्ग बांधकामाचा वेग कमी झाला तरी चालेल पण यापुढे शून्य अपघात मोहीम राबविली जाणार आहे.

कोविडपेक्षा अधिक लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले आहेत, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- कोविडमुळे 1.40 लाख तर अपघातांमुळे 1.50 लाखांपेक्षा अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. यात 25 ते 40 या वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. तामिळनाडू राज्याने अपघात नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने उत्तम योजना राबविली आहे. त्यामुळे 50 टक्के अपघातांमध्ये घट झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना ना. गडकरी म्हणाले- प्रत्येक जिल्हास्थानी स्थानिक खासदारांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील अधिकार्‍यांची एक समिती गठित केली आहे. खासदारांनी पुढाकार घेऊन आपल्या मतदारसंघातील अपघातस्थळांची माहिती एकत्रित करून द्यावी. त्यामुळे अपघात स्थळे निर्मूलन होण्यास मदत होईल, अशी विनंतीही त्यांनी केली.

वर्षभरात टोल नाके हटवणार
येत्या वर्षभरात महामार्गावरील टोल नाके हटविले जातील, अशी घोषणा केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली. सरकार पुढील वर्षभरात टोल नाके हटविण्याच्या योजनेवर काम करीत आहे. लोक रस्ते प्रवास जेवढा करतील तेवढाच त्यांना टोल द्यावा लागणार आहे, अशा पध्दतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरु असल्याचेही ना. गडकरी यांनी नमूद केले.

टोल नाके हटविले तर रस्ता तयार करणारी कंपनी नक्कीच त्याची भरपाई मागेल. पण सरकारने वर्षभरात महामार्गावरील सर्व टोल नाके हटविण्याची योजना तयार केली आहे,असे सांगून ते म्हणाले- टोल नाके हटविणे याचा अर्थ टोल वसुली बंद करण्यावर नाही तर फक्त टोल नाके हटविणे असा आहे.



Source link

Leave a Reply

%d bloggers like this: