सदर व पाचपावली येथे ‘कोव्हिड केअर सेंटर’ तातडीने सुरू करा - Expert News

सदर व पाचपावली येथे ‘कोव्हिड केअर सेंटर’ तातडीने सुरू करा


महापौर दयाशंकर तिवारी यांचे प्रशासनाला निर्देश

नागपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. शहरातील कोरोनाबाधितांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी शहरातील आयुष दवाखाना, सदर व पाचपावली येथील ‘कोव्हिड केअर सेंटर’ लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.

मागील वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात आयुष दवाखाना, सदर व पाचपावली रुग्णालयांमध्ये ‘कोव्हिड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले होते. यावर्षी पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या रोजच वाढत आहे. यादृष्टीने मनपाची आरोग्य यंत्रणा उत्तम कार्य करत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आवश्यक ते उपचार योग्यवेळी दिले जावेत यासाठी मनपाची दोन्ही ‘कोव्हिड केअर सेंटर’ महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळे ही दोन्ही केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली.

महापौरांच्या सुचनेनंतर आयुक्तांनी यासंदर्भात तातडीने दखल घेत येत्या दोन दिवसांमध्ये सदर व पाचपावली हे दोन्ही ‘कोव्हिड केअर सेंटर’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाला त्यांनी आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देशही दिले आहेत.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना बाधिताला आवश्यक ते सर्व उपचार वेळेमध्ये मिळावे यासाठी नागपूर महानगरपालिका सर्वप्रकारे प्रयत्नरत आहे. त्यादृष्टीनेच ‘कोव्हिड केअर सेंटर’ सुरू करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्वत:सह इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. शहरात लागू असलेल्या निर्बंधांचे पूर्णपणे पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.Source link

Leave a Reply

%d bloggers like this: