हनुमाननगर झोनमधील रेड झोन मध्ये दोन दिवस कोरोना चाचणी अभियान


महापौरांच्या निर्देशानंतर फिरते कोव्हिड चाचणी केंद्र तैनात

नागपूर : हनुमाननगर झोन मध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येथील रेड झोनमध्ये रविवार व सोमवार दोन दिवस पूर्णपणे चाचणी अभियान राबविण्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानुसार मनपाची आरोग्य सेवा चमू तैनात असून रविवार व सोमवार (२ व ३ मे) रोजी फिरत्या चाचणी केंद्राद्वारे विविध भागातील नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजता या मोहिमेला सुरुवात होईल.

हनुमान नगर झोन मधील वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (ता. ३०) झोन कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, झोन सभापती कल्पना कुंभलकर, सर्व नगरसेवक, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त सुषमा मांडगे, बकुल पांडे उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी सर्व नागरसेवकांसोबत चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. लवकर निदान झाल्यास त्वरित उपचार मिळू शकतो. यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे आवश्यक आहे. यासाठी मनापाकडे कार्यरत सर्व १० फिरते चाचणी केंद्र रविवारी व सोमवारी दोन दिवस झोनमधील धोकादायक ठिकाणी जाऊन नागरिकांची चाचणी करून घेतील. या सर्व मोहिमेची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांनी स्वीकारून चाचणी प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्याचे महापौरांनी सूचित केले. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन चाचणी करून घेण्याचे आवाहनही महापौरांनी केले आहे.

महापौरांच्या निर्देशानुसार हनुमान नगर झोनमधील महालक्ष्मी नगर, ,प्रभात नगर, कॉर्पोरेशन कॉलनी, ,चंद्रभागा नगर हुडकेश्वर, स्वागत नगर लेआऊट, कामगार कल्याण, गांधी पुतळा शाहू समाज भवन, चंदन नगर क्रीडा चौक, गणेश नगर, एम.एस.ई.बी. वाचनालय न्यू सुभेदार लेआऊट, सच्चीदानंद नगर समाजभवन चिखलकर महाराज मठाजवळ, चक्रधर नगर, विश्वकर्मा नगर, विठ्ठल नगर, कल्यानेश्वर नगर, महात्मा फुले कॉलनी, आकाश नगर या सर्व भागामध्ये दोन दिवस चाचणी अभियान राबविण्यात येणार आहे. दोन दिवसात सुमारे ५ ते ७ हजार व्यक्तींची चाचणी केली जाणार आहे.
Source link

Leave a Reply