११ एप्रिलला होणार नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ


महापौरांचे निर्देश : स्थायी समिती सभापतींनी घेतला तयारीचा आढावा


नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील तीन नद्या आणि अन्य नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. यावर्षी ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ होत असून लोकसहभागासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. कोरोना पॉजिटिव्ह असल्यामुळे महापौरांनी घरुनच ऑनलाईन बैठकीत भाग घेतला.

नदी स्वच्छता अभियान प्रारंभपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर यांनी गुरुवारी (ता. ८) ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी आमदार प्रा. अनिल सोले, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासवार, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त सहभागी झाले होते.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नागपुरातील नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदीची स्वच्छता लोकसहभागातून करण्यात येते. नदीतून गाळ उपसण्यात येतो. यासोबतच झोनअंतर्गत येणारे नाले, पावसाळी नाल्यांचीही सफाई करण्यात येते. या संपूर्ण मोहिमेला सुरू करण्याच्या दृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी १० मार्च रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत झोनमधील नाल्यांच्या स्वच्छतेचे निर्देश देण्यासोबतच मुख्य तीन नद्यांच्या स्वच्छता अभियानासाठी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर यांनी संपूर्ण तयारीचा झोननिहाय आढावा घेतला. नदी स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या पोकलॅण्ड, जेसीबी आणि अन्य मशिनरीजच्या तयारीसंदर्भात सर्व सहायक आयुक्तांनी माहिती सादर केली. ज्या ठिकाणी अद्यापही काही अडचणी येत आहेत, त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. शहरातील सर्व सर्पमित्रांची यादी तयार करून ती सर्वांना पाठवावी. जेणेकरून अभियानादरम्यान साप निघाल्याचे काही प्रसंग समोर आले तर त्यांना तातडीने पाचारण करता येईल, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सुचविले. नदीच्या प्रभाव क्षेत्रात (कॅचमेंट झोन) वृक्षारोपण करण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करण्यासही अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

दरवर्षी वेकोलि, मॉईल यासारख्या विभागाकडून नदी स्वच्छतेच्या कार्यात मोठी मदत होते. यावर्षीही प्रशासनाने अशा विभाग, संस्थांशी संपर्क साधून लोकसहभाग वाढवावा, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

११ एप्रिलला होणार शुभारंभ
नदी स्वच्छता अभियान हा नागपुरातील महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री, विरोधी पक्ष नेते, पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून शुभारंभप्रसंगी हजर राहण्याची विनंती करण्याची सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. तसेच शहरातील सर्व आमदार त्या भागातील नगरसेवक यांना सुध्दा आमंत्रित करावे. कोव्हिड -१९ च्या दिशा निर्देशांचे पालन यावेळी करण्याचे निर्देश ही महापौरांनी दिले. ११ एप्रिलला नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ अशोक चौक येथील नाग नदी पात्रातून होईल. पिली नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नारा घाट येथून तर पोहरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सहकार नगर घाटाजवळील नदीपात्रातून होईल.
Source link

Leave a Reply