१८ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात


महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली केंद्राला भेट

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार आज १ मे पासून नागपूरात १८ ते ४४ वर्षादरम्यानच्या व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली. प्राथमिक स्तरावर नागपूर शहरात इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह आणि आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली व लसीकरण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. निलू चिमुरकर उपस्थित होते.
याशिवाय उपमहापौर मनीषा धावडे यांनी पाचपावली सूतिकागृह तर स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी पाचपावली सूतिकागृह येथे आरोग्य समिती सभापती महेश महाजन व आयसोलेशन रुग्णालयात विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नगरसेवक विजय चुटेले, सहायक आयुक्त किरण बगडे उपस्थित होते.

पहिल्या दिवशी शनिवारी १ मे ला दुपारी २ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण या तीन केन्द्रांवर सुरु राहील. शनिवारी शहरातील तिनही लसीकरण केंद्रांवर नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. पूर्व नोंदणी केलेल्या व्यक्तींना केंद्रांवरून सकाळी टोकन देण्यात आले. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये व संपूर्ण प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी टोकन क्रमांकासह निर्धारित वेळ देण्यात आला. त्यामुळे नागरिकांची केंद्रावर गर्दी टाळता आली. लसीकरणानंतर अनेक तरुणांनी आनंद व्यक्त करीत सर्वांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.


यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, शुक्रवारी(ता.३०) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने आजपासून १८ ते ४४ वर्ष दरम्यानच्या व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सकाळी मनपाला लस प्राप्त झाले व तिनही केंद्रांवर लसीकरणाला प्रारंभ झाला. १५ मे पासून संपूर्ण शहरात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणार असून त्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी सुरू असलेल्या ९६ केंद्रांसह आणखी सुमारे ५० केंद्र सुरू करण्यात येतील व या सर्व केंद्रांवरून लसीकरण मोहिमेला गती दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

लस घेऊन स्वतःसह इतरांना सुरक्षित करण्यासाठी १८ वर्षावरील प्रत्येकाने लसीकरणासाठी पुढे यावे. यासाठी नागरिकांना आरोग्य सेतु किंवा कोविन ॲप वर ऑनलाईन नोंदणी करुन लसीकरणासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑफ लाईन नोंदणी करता येणार नाही. केवळ ऑन लाईन नोंदणी झालेल्यांनाच लस घेता येणार असून लसीकरणासाठी केन्द्रावर येतांना त्यांनी आपले आधारकार्ड सोबत आणावे, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.




Source link

Leave a Reply