लस आणि ‘एसएमएस’ हे संकटाशी लढण्याचे मोठे शस्त्र


‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचे प्रतिपादन

नागपूर : आज संपूर्ण देशात कोव्हिडचे संकट वाढत आहे. सर्वत्र संसर्गाचा धोका आहे. मात्र अशा स्थितीत भीती बाळगून बसण्यापेक्षा सतर्क राहणे आवश्यक आहे. आज आपल्याकडे लस उपलब्ध आहे. प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. पात्र असणा-या सर्वांनी लसीकरणासाठी पुढे यावे. ‘एसएमएस’ अर्थात सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टंसिंग या त्रीसूत्रीचे काटेकोर पालन हे सुद्धा अत्यावश्यक आहे. आज या संकटात ‘एसएमएस’ची त्रीसूत्री आणि कोव्हिड लस हे दोन मोठे शस्त्र आपल्याकडे आहेत. त्यामुळे येणा-यासंकटाचा धीराने सामना करा, सकारात्मक विचार ठेवा, असे आवाहन किंग्जवे हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजीशियन, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विम्मी गोयल आणि कन्सल्टंट फिजीशियन, आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.३०) डॉ. विम्मी गोयल आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी ‘कोव्हिड आणि कोव्हिडनंतर उद्भवणाऱ्या समस्या आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले. कोव्हिड पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांना काही सौम्य अथवा गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. वेळेवर निदान होउन लवकर उपचार मिळाल्यास रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत होते. मात्र कोव्हिड झाल्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस अथवा महिने काही समस्या जाणवतात. कोरोना व्हायरस मुख्यत: फुफ्फुसाला जास्त बाधित करू शकतो पण त्याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो. त्यामुळे कोव्हिड नंतर अनेकांना तीव्र स्वरूपात कमजोरी दिसून येते. अशास्थितीत स्वत:च्या मनाने उपचार करणे चुकीचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत व घरी उत्तम सकस आहार घ्यावा. शक्य होईल तसा प्राणायाम, व्यायाम करावा. याशिवाय कोरोना होउन गेल्यानंतरही अनेकांना खोकल्याचा खूप त्रास असतो. कोरोनाचा जास्त प्रभाव फुफ्फुसावर पडत असल्याने खोकला पुढील कालावधी राहू शकतो. यासाठी सुद्धा श्वासोच्छवासासंबंधी व्यायाम आणि प्राणायम करा. फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रुग्णांना पोटाच्या बळावर झोपण्याचा सल्ला दिला जातो. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. धुम्रपान, मद्यपान अशा सवयी सोडा. फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी सकस आहार घ्या, असा सल्लाही डॉ. विम्मी गोयल आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी दिला.

सध्याची परिस्थितीत खूप बिकट आहे. त्यामुळे कुठल्याही सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. सर्दी, खोकला, ताप हा साधा आहे असे म्हणून स्वत:च्या मर्जीने औषधे घेउ नका. ताप, खोकला जाणवल्यास आधी कोव्हिड चाचणी करा. कोव्हिडमध्ये ८० टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुद्धा गरज पडत नाही ते घरीच बरे होउ शकतात. त्यामुळे त्वरीत निदान झटपट उपचार यानुसार चाचणीसाठी पुढे या. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक जण लगेच सीटी स्कॅन करतात. भीतीपोटी अनेक जण वारंवार सुद्धा सीटी स्कॅन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येकच रुग्णाला सीटी स्कॅन करण्याची गरज नसते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले तरच सीटी स्कॅन करा. सीटी स्कॅनच्या रेडियशनमुळे रुग्णाला अन्य त्रास होउ शकतो. त्यामुळे स्वत:च्या मनाने वारंवार सीटी स्कॅन टाळा. आपल्याला एकदा कोरोना झाला, आता पुन्हा होणार नाही. या भ्रमात कुणीही राहू नका. कोरोना झाल्यानंतरही किंवा लस घेतल्यानंतर मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करा. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तणाव येणे स्वाभाविक आहे. मात्र भीती आणि तणाव हे आजार वाढविण्यास पोषक ठरतात. त्यामुळे आनंदी रहा, सकारात्मक रहा. एकमेकांच्या दूर असलात तरी संवाद साधत रहा. पॉझिटिव्ह व्यक्ती, त्यांच्या कुटुंबांना आधार द्या, असेही आवाहन डॉ. विम्मी गोयल आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी केले.




Source link

Leave a Reply