संवाद साधा, तणावमुक्त रहा ‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला


नागपूर : कोव्हिडमुळे उद्भवलेली स्थिती आणि लॉकडाउनसारख्या उपाययोजनांचा विपरित परिणाम अनेक कुटुंबांवर पडत आहे. कुटुंबांमध्ये कलह, नोकरी जाणे, पगार कपात अशा अनेक कारणांमुळे तणाव वाढत आहे. त्यात पुन्हा कोरोनाच्या संसर्गाची भीती. यामुळे मानसिक समस्यांचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियाचा आधार घेउन दिवस काढले जात आहेत. अशा स्थितीत संवाद दुरावला गेला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपल्या मनातील राग, भीती, चिंता बोलून दाखविणे, ती व्यक्त केल्यास तणाव कमी होतो. त्यामुळे संवाद साधा, तणावमुक्त रहा, असा सल्ला प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा एन.के.पी.एस.आय.एम.एस. आणि लता मंगेशकर हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाचे प्रा. डॉ. विवेक किरपेकर आणि मानसोपचारतज्ज्ञ सोसायटीचे सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता.२३) प्रा.डॉ.विवेक किरपेकर आणि डॉ.श्रीकांत निंभोरकर यांनी ‘कोव्हिड आजारातील मानसिक समस्या आणि निराकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले. आजच्या या परिस्थितीत कोव्हिडने मोठा मानसिक आघात केला आहे. यासाठी आपण सर्वांनी सकारात्मकरित्या काही गोष्टी करणे आवश्यक आहे. कोव्हिडचा संसर्ग झाल्याची अनेकांमध्ये भीती बसली आहे. ही भीती दूर घालविण्यासाठी सकारात्मक विचार अंगीकारा, स्वत:ला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा, आपले छंद जोपासा, मुलांना सोबत घेउन काही मनोरंजक, त्यांना रूची निर्माण होईल असे कार्य करा, त्यामुळे मुलेही व्यस्त राहतील. आज मला कोव्हिड झाला तर कुटुंबाचे कसे होईल, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन न मिळाल्यास कसे, अशा अनेक प्रकारची चिंता व भीती दिसून येते. या भीतीचा आणि चिंतेचा परिणाम आपल्या शरीरावर पडतो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होउ शकते. त्यामुळे सकारात्मक राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

कोरोनामुळे वाढणारी अवास्तव भीती, तणाव यामुळे व्यसनाचे प्रमाण खूप वाढले आहे. व्यवसांनापासून दूर राहण्याची आज खूप गरज आहे. त्याच्या परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो. सतत घरात रहावे लागत असल्याने अनेकांना वेळ कसा काढावा हा प्रश्न असतो. त्यातून मद्यपानाचे प्रकार वाढतात. अशा बाबी टाळण्यासाठी नवीन छंद जोपासावे. योगा, प्रणायाम, वाचन, लेखन आदीकडे लक्ष द्या. यामुळे मानसिक ताणतणावर येण्यापासून दूर ठेवता येईल. विशेष म्हणजे, आज आपल्याकडे लस हे बचावाचा शस्त्र आहे. त्यामुळे सर्वांनी लस घेण्यासाठी पुढे यावे. मानसिक आजार असलेल्यांना प्राधान्याने लस द्या, असे आवाहनही प्रा.डॉ.विवेक किरपेकर आणि डॉ.श्रीकांत निंभोरकर यांनी केले आहे.
Source link

Leave a Reply